लंडन James Anderson : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्रिकेटच्या मक्का समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडनं एक डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. अँडरसननं या त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. त्यानं 704 कसोटी विकेट्स घेऊन आपली कारकीर्द पूर्ण केली.
अँडरसनची 22 वर्षांची क्रिकेट कारकीर्द : 41 वर्षीय जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवरच झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर डिसेंबर 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अँडरसननं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो 188 कसोटी सामने खेळला आहे. फक्त 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरनं अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर 200 कसोटी सामने आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्धच्या धर्मशाळा कसोटी सामन्यात कुलदीप यादवला बाद करुन अँडरसननं याचवर्षी 700 बळी पूर्ण केले. यासोबतच जेम्स अँडरसननं 194 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. अँडरसननं 19 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. अँडरसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत 1627 धावा केल्या. अँडरसनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक अर्धशतक (81 धावा) आहे.
कसोटीचा बॉस जेम्स अँडरसन : जेम्स अँडरसननं यापूर्वीच एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता कसोटीला अलविदा करण्यासोबतच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही निरोप दिला. जेम्स अँडरसननं आपल्या राष्ट्रीय संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, विशेषत: कसोटी सामन्यांमध्ये, जिथं त्याची आकडेवारी सर्वात प्रभावी आहे. त्यानं कसोटीत तब्बल 188 सामने खेळताना एकूण 704 विकेट्स घेतल्या. जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे, ज्यानं 700 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या कालावधीत त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 32 वेळा पाच विकेट्स आणि तीन वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत.
शेवटच्या सामन्यात केले दोन मोठे विक्रम : जेम्स अँडरसननं आपल्या कसोटी कारकिर्दीत 40 हजाराहून अधिक चेंडू टाकले. 40 हजार किंवा त्याहून अधिक चेंडू टाकणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. यादरम्यान त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 50 हजारावा चेंडू देखील टाकला. हा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे.
सर्वाधिक कसोटी विकेट :
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका, 1992-2010) : 133 कसोटी - 800 विकेट्स
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007) : 145 कसोटी - 708 विकेट्स