महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताविरुद्धचा 'मॅन ऑफ द सीरीज' खेळाडू संघाबाहेर; इंग्रजांविरुद्ध 'कीवीं'चा दारुण पराभव, भारताचा फायदा - ENG BEAT NZ BY 8 WICKETS

इंग्लंड संघानं क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे. यासह त्यांनी 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ENG Beat NZ by 8 Wickets
इंग्लंड क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 1, 2024, 9:31 AM IST

क्राइस्टचर्च ENG Beat NZ by 8 Wickets : इंग्लंड क्रिकेट संघानं क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे. दुसऱ्या डावात टॉम लॅथमच्या संघानं केवळ 104 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ज्याचा पाठलाग इंग्लंडनं केवळ 12.4 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केला. यासह बेन स्टोक्सच्या संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हॅरी ब्रूक आणि ब्रेडेन कार्स हे या सामन्याचे नायक ठरले. कार्सनं संपूर्ण सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या. यासाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आलं. तर हॅरी ब्रूकनं 171 धावांची शानदार खेळी केली. हा सामना जिंकून इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला फायदा करुन दिला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात न्यूझीलंड संघात भारताविरुद्ध 'मॅन ऑफ द सीरीज' पुरस्कार मिळालेला विल यंगला स्थान मिळालं नव्हतं.

इंग्लंडनं दाखवली ताकद : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. 28 नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडनं आपली ताकद दाखवून दिली आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, इंग्लंड संघानं न्यूझीलंडला प्रत्येक विभागात पराभूत केलं आहे. बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून यजमान न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली आणि पहिल्या डावात त्यांना 348 धावांवर रोखण्यात यश मिळविलं. यादरम्यान ब्रेडन कार्सनं अप्रतिम गोलंदाजी करत 19 षटकांत 64 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात इंग्लंडनं 499 धावा केल्या आणि 151 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात इंग्लंडचा सहज विजय : दुसऱ्या डावात कार्सनं प्राणघातक गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडला केवळ 254 धावांवर रोखलं. टॉम लॅथमच्या संघानं केवळ 104 धावांचं लक्ष्य ठेवलं, जे इंग्लंडने केवळ 12.4 षटकांत पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या पराभवात त्यांचं क्षेत्ररक्षण हेही मोठं कारण होतं. संघानं पहिल्या डावात 8 झेल सोडले होते. यात 5 झेल हॅरी ब्रूकचे होते, ज्यानं 171 धावांची खेळी केली. त्याच्या दमदार कामगिरीमुळं एकेकाळी 71 धावांत 4 विकेट गमावलेल्या इंग्लंडला मोठी आघाडी घेता आली.

WTC मध्ये न्यूझीलंडला धक्का, भारताला फायदा : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या अंतिम फेरीसाठी सध्या 5 संघांमध्ये लढत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड हे WTC फायनलचे सर्वात मोठे दावेदार आहेत. या पाच संघांची शर्यत अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. प्रत्येक सामन्यासह टेबलमध्ये चढ-उतार असतात. इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळं न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. तथापि, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या किवी संघाचं कोणतंही नुकसान झालं नाही, परंतु त्याची टक्केवारी कमी होऊन श्रीलंकेच्या बरोबरीनं पाचव्या क्रमांकावर आहे. दोघांचे सध्या 50-50 टक्के गुण आहेत.

दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर : थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी किवी संघाला मालिकेतील सर्व सामने जिंकावे लागले. मात्र आता पुढील दोन सामने जिंकूनही इतर संघांवर अवलंबून राहावं लागणार आहे. याचा मोठा फायदा भारताला होताना दिसत आहे. या पराभवानंतर भारताला एक प्रतिस्पर्धी गमावण्याची शक्यता आहे. अलीकडेच भारतीय संघानं पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेला पराभूत करुन थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा :

  1. दक्षिण आफ्रिकेकडून 'लंकादहन'... पहिल्याच कसोटीत श्रीलंकेचा दारुण पराभव
  2. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना सुरु असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अटक, क्रिकेट विश्वात खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details