हॅमिल्टन New Zealand Squad Announed :19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा होणार आहे. या आयसीसी स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा न्यूझीलंड हा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्याचं नेतृत्व मिशेल सँटनर करणार आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला संघात स्थान मिळालेलं नाही. आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यात असे 3 खेळाडूंचाही समावेश आहे, जे पहिल्यांदाच वरिष्ठ स्तरावर आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसतील. हे तीन खेळाडू संघाचे वेगवान गोलंदाज आहेत. बेन सीयर्स, विल्यम ओ'रोर्क आणि नॅथन स्मिथ हे तिघं पहिल्यांदाच वरिष्ठ स्तरावर ICC ची स्पर्धा खेळतील.
कर्णधार सँटनरसाठी पहिलीच संधी : 2017 नंतर पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात आहे. अशा परिस्थितीत, संघाचा कर्णधार मिशेल सँटनरला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत कर्णधारपद भूषवण्याची ही पहिलीच संधी असेल. म्हणजे त्याच्यासमोर मोठं आव्हान असेल. सँटनरला नुकतंच न्यूझीलंडचा व्हाईट बॉल कर्णधार बनवण्यात आलं आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सँटनरला खेळाडू म्हणून खेळताना पाहिले गेले.
कोणत्या खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव : कर्णधार मिशेल सँटनर व्यतिरिक्त, केन विल्यमसन आणि टॉम लॅथम हे देखील संघात आहेत ज्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. सँटनरप्रमाणेच, दोघंही 2017 च्या आवृत्तीत खेळले आहेत. केन विल्यमसन 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला आहे. म्हणजेच, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघातील विल्यमसन हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे.