मुंबई BCCI Review Meeting : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत 0-3 अशा लाजीरवाण्या पराभवामुळं अत्यंत नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) अखेर भारतीय संघाच्या व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहेत. अलीकडेच, भारतीय संघ किवी संघाविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकू शकला नाही आणि 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेतील प्रत्येक सामना हरला. या पराभवानंतर पाच दिवसांनी कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांच्यासमोर हजर झाले, जिथं पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली आणि 3 सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्याकडून उत्तरे मागवण्यात आली.
BCCI सोबत 6 तास बैठक : मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत तीन दिवसांतच भारतीय संघाचा पराभव झाला. यानंतरच बोर्ड या धक्कादायक कामगिरीवर प्रशिक्षक आणि कर्णधाराला प्रश्न विचारणार असल्याची बातमी आली. ही बैठक शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी झाली, ज्यात गंभीर आणि रोहित व्यतिरिक्त निवड समिती प्रमुख आगरकर देखील उपस्थित होते. पीटीआयनं बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्यानं त्यांच्या अहवालात सांगितलं की, मुंबईतील BCCI च्या मुख्यालयात झालेली ही आढावा बैठक 6 तासांची होती, ज्यात प्रशिक्षक गंभीर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होता.
तीन महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा : पीटीआयच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे की, या बैठकीत संपूर्ण मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनानं घेतलेल्या अशा काही निर्णयांवर स्पष्टीकरण मागवण्यात आलं होतं. तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा झाली, त्यापैकी एक मुंबई कसोटी खेळपट्टी आणि दुसरा म्हणजे जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा. पहिल्या दोन कसोटीत पराभूत होऊनही उपकर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आल्यानं बोर्डाचे अधिकारी फारसं खूश नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया मालिका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.