मेलबर्न Seagull Bird Death :क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ, मैदानावर खेळल्या जाणाऱ्या अशा कोणत्याही खेळात अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत राहतात. बहुतेक वेळा असं घडतं की एखादा खेळाडू जखमी होतो. पण ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या बिग बॅश लीगमध्ये असा अपघात घडला, ज्यात एका खेळाडूला नाही तर एका पक्ष्याला गंभीर दुखापत झाली. मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली.
कधी झाला अपघात :हा बीबीएल सामना गुरुवार, 9 जानेवारी रोजी मेलबर्नमध्ये खेळला जात होता. या सामन्यात सिडनी सिक्सर्स संघ फलंदाजी करत असताना, त्यांच्या फलंदाज जेम्स विन्सनं मारलेल्या शॉटमुळं हा अपघात झाला. सिडनीचा संघ 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि त्यावेळी विन्स फलंदाजीसाठी क्रीजवर उपस्थित होता. डावखुरा वेगवान गोलंदाज जोएल पॅरिस डावाच्या 10 व्या षटकात गोलंदाजी करत होता आणि त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा अपघात झाला.
कसा झाला अपघात :विन्सनं हा चेंडू सरळ सीमारेषेकडे खेळला. चेंडू काही वेळ हवेत होता पण सीगलचा एक मोठा कळप सीमारेषेजवळ बसला होता. नेमक्या याच वेळी, वेगानं येणारा एक चेंडू थेट या पक्ष्यांपैकी एकावर पडला. चेंडू सीगलवर आदळताच त्याचे पंख फाटून जमिनीवर विखुरले गेले. तो सीगल झुंजत राहिला तर बाकीचा कळप हवेत उडून गेला. तर चेंडू 4 धावांसाठी गेला. हे दृश्य पाहून जेम्स विन्सच्या चेहऱ्यावरही जखमी सीगलबद्दल काळजी दिसू लागली. खेळाडूंसोबतच प्रेक्षक आणि समालोचकांनाही धक्का बसला आणि निराशा झाली. प्राप्त माहितीनुसार हा पक्षी मरण पावला.
यापूर्वीही झाले असे अपघात : ऑस्ट्रेलियामध्ये सामन्यादरम्यान चेंडू लागल्यानं पक्षी जखमी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. असे काही अपघात यापूर्वीही घडले आहेत. खरंतर, डिसेंबर-जानेवारी महिन्यात, ऑस्ट्रेलियामध्ये सीगलचे कळप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडतात. अशा परिस्थितीत, कधीकधी त्यांचे कळप मेलबर्न आणि इतर काही मैदानांवर देखील पोहोचतात. यामुळं अशा अपघातांचा धोका कायम राहतो आणि खेळाडूंनाही अडचणींचा सामना करावा लागतो. या सामन्यातही असंच काहीसं घडलं. सामन्यादरम्यान, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावर सीगलचा एक कळप उपस्थित होता आणि तो सतत एका भागातून दुसऱ्या भागात उडत होता. यामुळं, मेलबर्नचा खेळाडू बेन डकेटनं एकदा एक साधा झेल सोडला कारण त्यावेळी सीगल देखील उडत होते.
हेही वाचा :
- पराभवाची भीती...? इंग्रजांनंतर आणखी एका संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची तयारी
- "हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तर..." फिरकीपटू आर अश्विनचं वक्तव्य; नवा वाद होणार?