महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ॲडलेडच्या 'पिंक बॉल' कसोटीत भारताकडून पाच खेळाडू करणार 'डेब्यू' - PINK BALL DAY NIGHT TEST

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी असेल. हा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हल मैदानावर सुरु होईल.

Aus vs Ind Day-Night Test
भारतीय क्रिकेट संघ (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 3, 2024, 2:36 PM IST

ॲडलेड Aus vs Ind Day-Night Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना ॲडलेड ओव्हल इथं खेळवला जाईल, जो दिवस-रात्र कसोटी सामना असेल. हा सामना 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघांमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला होता तेव्हा भारतीय संघ 36 धावांवर ऑलआऊट झाला होता. पण यावेळी भारतीय संघानं या मालिकेला धमाकेदार सुरुवात केली आहे. भारतानं पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत भारताच्या प्लेइंग 11 मध्ये फारसा बदल होणार नाही. म्हणजेच या सामन्यात किमान 5 खेळाडूंचे विशेष पदार्पण होणार आहे.

पाच खेळाडू करणार ॲडलेडमध्ये पदार्पण : या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचं पुनरागमन निश्चित आहे. वैयक्तिक कारणांमुळं तो पहिला सामना खेळू शकला नाही. त्याचवेळी, शुभमन गिल अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळं पर्थ कसोटीत सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत तो वेळेवर सावरला तर त्याचाही संघात समावेश निश्चित आहे. याचा अर्थ गिल-रोहितच्या पुनरागमनामुळं फलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतो. हे दोन खेळाडू प्लेइंग 11 मध्ये आले तर पर्थ कसोटी खेळलेल्या दोन खेळाडूंना बाहेर बसावे लागेल. याशिवाय 9 खेळाडू ॲडलेड कसोटी खेळतानाही पाहता येतील.

5 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार दिवस-रात्र कसोटी : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये 2 पेक्षा जास्त बदल झाले नाहीत तर किमान 5 खेळाडू 'पिंक बॉल' टेस्टमध्ये पदार्पण करतील, म्हणजेच हे खेळाडू पहिल्यांदाच भारतासाठी डे-नाईट टेस्ट मॅच खेळतील. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा हे 5 खेळाडू आहेत. या खेळाडूंनी पर्थ कसोटीत चांगली कामगिरी केली होती, त्यामुळं ते ॲडलेड कसोटीत खेळण्याचे सर्वात मोठे दावेदार आहेत.

गुलाबी चेंडूच्या कसोटीत भारताची कामगिरी कशी :भारतीय संघानं आपल्या क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 4 गुलाबी चेंडूचे कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघानं 3 सामने जिंकले असून 1 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच हा पराभव पत्करावा लागला होता. याशिवाय घरच्या मैदानावर खेळताना भारतानं संघांचं उर्वरित सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 12 गुलाबी चेंडूचे कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियन संघानं 11 सामने जिंकले असून केवळ 1 सामना गमावला आहे. या वर्षी त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. म्हणजेच पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड भारतीय संघापेक्षा खूपच चांगला आहे.

हेही वाचा :

  1. 'मॅचविनर' अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान नाही; आगामी सामन्यासाठी युवा कर्णधारासह संघाची घोषणा
  2. निर्णायक सामन्यात झिम्बाब्वेचा संघ भारताच्या शेजाऱ्यांवर पलटवार करणार? हायव्होल्टेज T20 मॅच 'इथं' पाहा लाईव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details