सोलापूर Ram Mandir Pran Pratishta : २२ जानेवारी २०२४ राम जन्मभूमीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. देशभरात सर्व लोक अगदी थाटामाटात रामलल्लांचं स्वागत करत आहेत. या सोहळ्याची तयारी प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळे उपक्रम राबवून करण्याच्या प्रयत्न करत आहेत. सोलापुरातील टॅटू आर्टिस्ट निखिल तलकोकुल यानं स्वतःच्या रक्तानं प्रभू श्री रामाचं अन् मंदिराचं चित्र रेखाटत अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं आहे.
प्राणप्रतिष्ठेला रामाची प्रतिमा दुकानात लावली : निखिल याने २ फूटच्या साइजचे प्रभू श्री रामाचं आणि अयोध्या मंदिराचं चित्र अतिशय सूक्ष्मपणं काढलं आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी या चित्राची फ्रेम करून तो आपल्या दुकानात लावणार आहे. निखिल हा मुळात चित्रकार आहे. मात्र कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तो टॅटू काढण्याचं काम करतो. आजपर्यंत निखिल तलकोक्कुल यानं छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री सिद्धेश्वर महाराज या महापुरुषांच्या विविध मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या आहेत. त्याच्या चित्राची आणि रांगोळ्यांची नोंद जागतिक स्तरावरील संघटनेनेही घेतली आहे.