हैदराबाद Jyeshtha Gauri Avahana 2024 : राज्यात शनिवारी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आता महिलांची लगबग सुरु झाली आहे ती ज्येष्ठा गौरी आगमनाची. ज्येष्ठा गौरींना विदर्भात 'महालक्ष्म्या' म्हणतात. ‘लक्ष्मी’ या शब्दाआधी ‘महा’ हे विशेषण लावून ‘महालक्ष्मी’ हा शब्द तयार झाला. मराठवाड्यात ‘लक्ष्म्या’, तर कोकणात ‘गौरी’ म्हटलं जातं. तर अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची कथा काय आहे ते जाणून घेणार आहोत.
ज्येष्ठा गौरी आवाहन वेळ (Jyeshtha Gauri Avahana) : मंगळवारी, (10 सप्टेंबर) रोजी गौरीचं आवाहन आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन केलं जाणार असून गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे.
गौरी आवाहन शुभ मुहूर्त : 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच या दिवशी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे.
काय आहे आख्यायिका : 'समुद्र मंथन' या लेखात सांगितल्याप्रमाणं, मंथनातून 'श्री महालक्ष्मी' आणि त्यांची बहीण 'श्री अलक्ष्मी'चा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे 'येणारं धन' आणि श्री अलक्ष्मी म्हणजे 'येणारं धन जे खर्च होतं'. याप्रमाणं लक्ष्मीची थोरली बहीण 'अलक्ष्मी' ही देखील पूजनीय आहे. 'समुद्र मंथना'तून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं. साक्षात श्री विष्णूनं श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह (अलक्ष्मी) झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असं श्री लक्ष्मीनं सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला.