महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' शुभ मुहूर्तावर करा हरतालिका पूजा; जाणून घ्या शंकर पार्वती व्रताची आख्यायिका - Hartalika Teej 2024

Hartalika Teej 2024: हरतालिका पूजा व्रत सुवासिनी आपल्या नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी करतात. या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जळी व्रत करतात. शृंगार करून पूजा, आरती करतात आणि व्रताची कथा वाचतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात. तर हरतालिका (Hartalika) पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, काय आहे व्रताची आख्यायिका जाणून घेऊयात.

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 7:07 PM IST

Hartalika Puja
हरितालिका 2024 (ETV BHARAT HINDI DESK)

हैदराबाद Hartalika Teej 2024 : भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला 'हरतालिका' (Hartalika) व्रत केलं जातं. विवाहित महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात. हरतालिका गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) आदल्या दिवशी केली जाते. यंदा हरतालिकेचं व्रत शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी आहे.

हरतालिका मुहूर्त: भाद्रपद शुक्ल पक्षाची तृतीया तिथी ही गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनी सुरू झाली असून 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 1 मिनिटांनी संपणार आहे. उदयतिथीनुसार हे व्रत 6 सप्टेंबर रोजी केलं जाईल. हरतालिका तृतीयेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 2 मिनिटांपासून ते 8 वाजून 32 मिनिटांपर्यंत असेल. तसंच संध्याकाळी पूजेसाठी सर्वोत्तम वेळ 5 वाजून 26 मिनिटांपासून ते 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असेल.

हरतालिका पूजा विधी : सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. चौरंगावर वाळूचं शिवलिंग आणि शंकर पार्वती तयार करावी. डावीकडं थोड्या अक्षतांवर गणेशाचं प्रतिक म्हणून सुपारी ठेवावी. ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी काढावी आणि वेगवेगळ्या प्रकारची पानं, फुलं वाहून पूजा करावी. नंतर हरतालिकेचीकहाणी वाचावी.

हरतालिका व्रताची अख्यायिका :अशी अख्यायिका आहे, की एके दिवशी शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, की महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? ज्यात श्रम थोडे आणि फळ पुष्कळ मिळेल. असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्याईतून तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

पार्वतीच्या लग्नासाठी वडिल चिंताग्रस्त: शंकर म्हणाले की, हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं होतं. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दु:ख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली तसंच येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य पती आहे. त्यांनीच मला तुझ्याकडं मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली.

असं केलं हरतालिका व्रत : नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस. महादेव सोडून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं शिवलिंग पार्वतीसह स्थापन केलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिय्येचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केली, अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात.

(डिस्क्लेमर - शास्त्र पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टींवर वरील लेख आधारित आहे. त्याच्याशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असं नाही.)

हेही वाचा -

  1. कृष्ण भेटला गं सखे कृष्ण भेटला! नाशिकच्या 200 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रुपांचं दर्शन - Shri Krishna Janmashtami
  2. उत्तर रामायण किंवा उत्तरकांड 'अस्सल' आहे का? - Is Uttara Ramayana Authentic

ABOUT THE AUTHOR

...view details