हैदराबाद Ganeshotsav 2024 : शनिवारी (7 सप्टेंबर) दिवसभर गणेश चतुर्थी आहे. त्यामुळं सूर्योदयापासून तुमच्या सवडीनुसार दिवसभर कधीही गणेशपूजा करता येईल. पूजेसाठी आधी सर्व तयारी करुन घ्यावी. त्यासाठी पाणी वस्त्र, कापसाचे वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत तयार करुन घ्यावं. गंध उगाळून घ्यावा. जी शक्य असतील ती फुले घ्यावीत.
पूजा करण्यासाठी स्टेप्स पुढीलप्रमाणे :
सर्व साहित्य घेतल्यानंतर स्नान केलेल्या व्यक्तीनं पूजेसाठी स्वच्छ वस्त्र परिधान करुन पाटावर बसावं. सुरुवातीला कपाळाला गंध लावावा. सर्वसाधारणपणे गणपतीच्या मूर्तीचे तोंड दक्षिणेला होणार नाही अशी काळजी घेऊन गणपती बसवण्याची जागा निवडावी. अशा यथाशक्ती सजवलेल्या जागी गणपतीची मूर्ती ठेवावी. गणपतीची मूर्ती पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी. त्यावर आधी नवीन वस्त्र ठेवावे. शक्यतो हे वस्त्र लाल रंगाचे असावे. त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवून मूर्ती ठेवावी.
मूर्ती वस्त्रावर ठेवल्यानंतर पूजा विधिला सुरुवात करावी. यामध्ये सुरुवातीला समई किंवा निरंजन लावून घ्यावे. त्यानंतर नमस्कार करावा. पूजा विधीसाठी घेतलेल्या सर्वच साहित्यावर दूर्वा किंवा फुलाने पाणी शिंपडून ते पवित्र करुन घ्यावे. तसंच स्वतःच्या डोक्यावरही पाणी शिंपडून स्वतःला पवित्र करुन घ्यावे.
सगळी पूजा सामग्री पवित्र करुन घेतल्यावर पळीमध्ये पंचपात्रातील पाणी घेऊन संकल्प सोडावा. सर्वांना सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, शांतता लाभो अशी प्रार्थना यावेळी करावी. त्यानंतर नमस्कार करुन गणपतीचे ध्यान करावे. त्यानंतर गणपतीचे आवाहन करुन प्रतिष्ठापना करावी.