हैदराबाद :भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सण देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे दर्श वेळा अमावस्या (Vel Amvasya) होय. याला 'येळवस' असंही म्हणतात. मराठवाड्यात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतकरी तिची मनोभावे पूजा करतो. 'वेळा अमावस्या' (Amavasya) साजरी करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आजही मराठवाड्यात पाळली जाते.
रब्बी हंगामासाठी देवाकडं प्रार्थना : पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला 'येळवस' साजरी केली जाते. या दिवशी शेतात कडब्याच्या खोपीत लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाते आणि तिला नैवद्य दाखवला जातो. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसंच रब्बी हंगामातील पिके गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सुर्यफूल आदी पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे, अशी देवाकडं प्रार्थना केली जाते. यानंतर भोजनाचा आनंद लुटला जातो. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीच्या काही भागात साजरा केला जातो.