हैदराबाद-हिंदू धर्मात वसंत पंचमीचं विशेष ( basant panchami 2025) असं महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवी सरस्वतीचा अवतार हा वसंत पंचमीच्या दिवशी झाला. त्यामुळे ज्ञानाची देवता म्हणून मान्यता असलेल्या देवी सरस्वतीची वसंत पंचमीला पूजा करण्याची परंपरा आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, वसंत पंचमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला साजरी केली जाते. त्यानुसार देशात आज वसंत पंचमी साजरी केली जाते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा केल्यानं बुद्धिमत्ता, ज्ञान मिळून प्रगती मिळते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे देवी सरस्वतीची शाळा आणि मंदिरांमध्ये विशेष पूजा केली जाते. वसंत पंचमीला श्री पंचमी, वसंत पंचमी, सरस्वती पंचमी आणि ऋषी पंचमी असंही म्हटलं जातं.
- लग्नासाठी शुभ असते वसंत पंचमी:वसंत पंचमीच्या दिवशी लग्न, नामकरण समारंभ, गृहप्रवेश, मुंडन आणि सोने-वाहन अशा महागड्या वस्तुंची खरेदी केली जाते. वसंत पंचमीला लग्न करणाऱ्या वधू-वराला देव-देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात, असे मानलं जाते. त्यामुळे लग्नासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो.
वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त कधी ( saraswati puja shubh muhurat) :वसंत पंचमीची पंचमी तिथी आज सकाळी ९:१४ वाजता सुरू होईल. तर ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:५२ वाजता तिथी संपेल. ३ फेब्रुवारी रोजी सूर्योदयासह पंचमी तिथी संपणार आहे. देशाच्या काही भागात वसंत पंचमी २ फेब्रुवारी रोजी तर बिहारसह अनेक राज्यात ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाईल. या वर्षी वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त २ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०९ ते दुपारी १२:३५ पर्यंत शिवयोगाला असणार आहे. त्यामुळे आज सरस्वती देवीची पूजा करण्यासाठी ५ तास २६ मिनिटे उपलब्ध होणार आहेत.