चंद्रपूर Lok Sabha Election 2024 : आणीबाणी दरम्यान काँग्रेसनं विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केला, असं वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रचारसभेत केलं होतं. यावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे. अशातच या वक्तव्यावरून संतप्त होऊन एका तरुणानं मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचार रथावर शेण फेक केलीय. ही घटना कोरपना तालुक्यातील खिर्डी येथील घडली आहे.
उमेदवारी रद्द करण्यात काँग्रेसची मागणी : चंद्रपूर लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात होत आहे. 19 एप्रिलला मतदान होणार आहे. काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार आहेत. सध्या भाजपा विरुद्ध काँग्रेस असा प्रचार सुरू आहे. 8 एप्रिलला मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावरून बोलताना मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपाची सत्ता आली तर या देशात हुकूमशाही येईल असा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला होता. याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही. ज्यांनी आणीबाणी लावली, शीख दंगलीत काँग्रेसने विरोधकांची माहिती काढण्यासाठी भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केले, असं वादग्रस्त वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. यानंतर मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनं केलीय.