माढाUttamrao Jankar support NCP: माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे अजित पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांनी आज माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिलाय. आमच्या गटाचे नेते अजित पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाल्याशिवाय मी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार नाही असं त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच आपण जाब विचारण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचा खुलासाही जानकर यांनी केला.
कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय : माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच सातत्यानं रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. भाजपानं विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानं अकलूज येथील मोहिते पाटील गट अस्वस्थ झाला होता. त्यांनी निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली होती. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली आणि त्यात मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली आणि मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात समावेश झाला. मोहिते पाटील यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश झाल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला ताकद मिळाली. मात्र मोहिते पाटील यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खास विमानानं देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना नागपूर इथं भेटीसाठी बोलवलं होतं. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उत्तमराव जानकर यांनी वेळापूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह बैठक घेतल्यानंतर जानकर समर्थक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या तुतारीला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा उत्तमराव जानकर यांनी 19 तारखेला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.