नागपूर : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला असून सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज (17 डिसेंबर) अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध मुद्द्यांवर आंदोलन केलं. तर सभागृहात बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरूनही गदारोळ पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आज त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्र्यांच्या वजाबाकीची चर्चा जास्त : महायुतीचं सरकार ईव्हीएमच्या विजयानं आलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. राक्षसी बहुमत मिळालं आहे, पण विजयाचा आनंद कुठेच दिसत नाही. मंत्रिमंडळ विस्तार झालाय, परंतु विस्तारापेक्षा मंत्र्यांच्या वजाबाकीची चर्चा जास्त आहे. तसंच ज्यांनी शाश्वत धर्मामुळं आम्ही कोणाला सोबत घेणार नाही असं म्हटलं होतं. ते आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
लाडकी बहीण योजनेवरुन हल्लाबोल : पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी 'लाडकी बहीण योजने'वरुन महायुती सरकारवर निशाणा साधला."सरकारनं निवडणुकीपूर्वी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेतून आचारसंहितेपूर्वी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला होता. असे एकूण साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेत. त्यावेळी कोणतेही निकष किंवा नियम पाहिले गेले नाहीत. मात्र, आता या योजनेत निकष लावले जाणार असल्याचं बोललं जात आहे. लाडक्या बहिणीला आता आवडती-नावडती बहीण करायला लागलेत. ज्या महिलांना पूर्वी या योजनेला लाभ दिला होता, त्या सरसरट महिलांना योजनेचा लाभ द्यावा," असं उद्धव ठाकरे म्हणाले. "सरकारनं निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनामात अनेक घोषणा केल्या होत्या. त्या घोषणा त्यांनी पाळाव्यात. आम्ही सोयाबीनला हमीभाव देऊ, असं म्हटलं होतं, परंतु आमचं सरकार आलं नाही. आता या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण करावं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईत 1400 झाडांची कत्तल? : "राज्यपालांचं अभिभाषण झालं, तेव्हा मी नव्हतो. परंतु आज त्याची प्रत मी वाचली. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात हे माझं राज्य असा उल्लेख केला आहे. पर्यावरणासाठी त्यांनी आता एक समिती गठीत केली आहे. त्या समितीत कोण कोण असणार? त्यांनी कुठला अभ्यास केलाय? आणि ते आता काय अहवाल देणार? हे कळलं पाहिजे. आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही मेट्रो कारशेड येथील कामाला स्थगिती दिली होती. पण या सरकारनं मुंबईत मेट्रोसाठी गोरेगावमधील अनेक झाडांची कत्तल केली आहे. मुंबईतील डोंगरी येथील 1400 झाडांची देखील कत्तल केला जाणार आहे, अशी बातमीही आत्ता समोर आली आहे. जर झाडांची एवढी कत्तल होणार, असेल तर पर्यावरण समिती काय कामाची? ते काय अभ्यास करणार? या झाडांची एवढी कत्तल होणार, हे त्यांना दिसणार की नाही?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा : "बीडमधील एका माजी सरपंचाची हत्या झाली आहे. आता याच्यावर सभागृहात चर्चा होणार आहे. हत्या झाल्यानंतर एवढ्या दिवसांनी सभागृहात जर चर्चा होत असेल, तर आरोपीवर शिक्षा व्हायला किती दिवस लागतील हे समजत नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पण मंत्र्यांना अधिकच धाकधूक आहे. आमचे अनिल परब आणि संजय पोतनीस हे क्रिकेटचा फिरता चषक सामन्याची स्पर्धा भरवतात, तसं आता हे मंत्रिमंडळ फिरता चषक होणार आहे. कारण त्यांना अडीच-अडीच वर्षाचं आश्वासन दिलं आहे. जसं मंत्र्यांचा फिरता चषक अडीच वर्ष होणार, तसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं पण होणार का? हे समजलं पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.