कणकवली Uddhav Thackeray Kankavli Sabha : ठाकरे गटाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (3 मे) कणकवलीत सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? : यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मागील 10 वर्षांत देश लुटला. आता ते महाराष्ट्र लुटायला येतात. मात्र, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मोदी-शाह यांनी लुटलेलं सर्वकाही वसूल केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शुभ बोलणाऱ्यांनी मला अडवण्याची आणि धमकीची भाषा वापरू नये, तसा प्रयत्न त्यांनी केला तर त्यांना आडवा केल्याशिवाय राहणार नाही. तसंच शाहांनी आम्हाला आव्हान करू नये. त्यांच्यात हिंमत असेल तर कोकणातील रिफायनरी रद्द करून दाखवावं. तसंच 2024 लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देणाऱ्या मोदी-शाहांच्या भाजपाला जनता राजकीयदृष्ट्या तडीपार करेन. महाराष्ट्रातील जनता मशालीची धग काय असते ती भाजपाला दाखवून देईल. भाजपाचा संविधान बदलण्याचा डाव असून त्यांचा हा डाव देशवासीयांनी हाणून पाडावा", असं आवाहनही यावेळी ठाकरेंनी केलं.