मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास बाकी असताना, नालासोपारा येथे भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीनं केला. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व पक्षाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "जर विनोद तावडे पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर आला असला तर, हा व्हिडिओ निवडणूक आयोगानं बघायला पाहिजे," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनेी दिली.
...नाही तर निवडणूक आयोगावर कारवाई : "सोमवारी अनिल देशमुखांचे डोके आपोआप फुटले. मी आज तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो, तिकडं माझी बॅग चेक केली. त्यामुळं हे जादूचे पैसे आले कुठून? आणि कोणाचे आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच निवडणूक आयोगानं कडक कारवाई केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.
आरोपी फरार होता कामा नये : पैसे वाटल्याच्या प्रकरणावरून विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता ते म्हणाले की, "गुन्हा दाखल झालाय तर ठीक आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपी पळून जाता कामा नयेत. पैसे वाटल्याच्या प्रकरणात काही आरोपी फरार झाले आहेत, अशी माझ्याकडं ऐकीव माहिती आहे. अर्थात माझ्याकडं कोणतेही पुरावे नाहीत. तुमच्याकडं व्हिडिओ असतील तर समोर द्यावे. परंतु, या प्रकरणात निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आरोपी पळून जाता कामा नयेत. कारण कायदा सर्वांना सारखा असेल तर त्या कायद्याची आता अंमलबजावणी होणे गरजेचे आहे."