साताऱ्यात खासदार उदयनराजेंचं जंगी स्वागत सातारा Udayanraje Bhosale Entry in Satara : उमेदवारी संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेले खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) भोसले यांचं सातऱ्यात आगमन होताच राजे समर्थकांनी जेसीबीमधून पुष्पवृष्टी आणि क्रेनच्या साह्यानं एक लाख फुलांचा हार घालून त्यांचं जंगी स्वागत केलं. दरम्यान, मी निवडणूक लढणारच, असा ठाम निर्धार त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केलाय.
अमित शाहांकडून उदयनराजेंना ग्रीन सिग्नल : आठवडाभरापासून खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत होते. तीन दिवसांनी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट झाली. त्यानंतर उदयनराजेंच्या उमेदवारीला अमित शाहांनी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा राजे समर्थकांमध्ये सुरू झाली होती. बुधवारी उदयनराजे साताऱ्यात येणार असल्याचं समजल्यापासून त्यांचे समर्थक स्वागताच्या तयारीला लागले होते. जेसीबी, क्रेन, हारतुऱ्यांची ऑर्डर देण्यात आली होती. 'आरंभ है प्रचंड..', अशा मथळ्याखाली मोठमोठे बॅनर्स महामार्गावर लावले होते.
जेसीबीमधून उदयनराजेंवर पुष्पवृष्टी: खासदार उदयनराजेंचे दुपारी शिरवळमध्ये आगमन होताच जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच एक लाख फुलांचा हार क्रैनच्या साह्यानं घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शिरवळमधील नीरा नदीच्या पुलावर उदयनराजेंचं आगमन झाल्यानंतर समर्थकांनी 'एक नेता, एक आवाज उदयन महाराज, उदयन महाराज', अशी घोषणाबाजी केली. यावेळी पुणे बंगळुरू महामार्गावर ट्रॅफीक जाम झालं होतं. अमित शाहांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याचं संकेत मिळाल्यापासून राजे समर्थकांमध्ये उत्साह संचारला होता.
उमेदवारीची अधिकृत घोषणा नाही: अजित पवार यांचा सातारा लोकसभेच्या उमेदवारीवर दावा आहे. त्यामुळं भाजपासह खासदार उदयनराजे भोसले यांची देखील कोंडी झाली होती. मात्र, आता ही कोंडी फुटल्याचं एकंदरीत संकेत मिळू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना 'मी निवडणूक लढणारच', असं उदयनराजेंनी बोलून दाखवलं. त्यावरून साताऱ्यात महायुतीचे तेच उमेदवार असतील, असं चित्र दिसू लागलंय.
हेही वाचा -
- अमरावतीत नवनीत राणा यांच्या हाती कमळ: भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून केले जाहीर - Navneet Rana BJP Candidate
- महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात; चार एप्रिलला भरणार अर्ज - lok Sabha Elections
- महाविकास आघाडी राहिली 'वंचित', प्रकाश आंबेडकर यांनी ८ जागांवरील उमेदवारांची केली घोषणा - Prakash Ambedkar news