सुषमा अंधारे पत्रकार परिषद पुणे Sushma Andhare On PM Modi : पुण्यात आज (29 मार्च) शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलत असताना सुषमा अंधारे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच ठाणे मतदारसंघाविषयी विचारण्यात आलं असताना त्यांनी, 'ठाण्याच्या जागेवर पंतप्रधान मोदी जरी उभे राहिले तरी ती जागा आम्हीच जिंकणार', असा दावा केला.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे? : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती तसंच महाविकास आघाडीकडून आपापल्या मित्र पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात अजूनही दोन्ही शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्याच्या जागेवरुन निवडणूक लढवली तरी त्या जागेवर आम्हीच विजयी होणार", असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विजय शिवतारेंचा क्लायमॅक्स स्क्रिप्ट रायटरने अगोदरच लिहून ठेवला :शिवसेनेचे (शिंदे गट) नेते विजय शिवतारे यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया देत सुषमा अंधारे म्हणाल्या की, "शिवतारेंनी घेतलेला युटर्न हा त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने लिहिलेल्या गोष्टींना साजेसा आहे. त्यांच्या स्क्रिप्ट रायटरने अगोदरच क्लायमॅक्स लिहून ठेवला असेल यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही", असं त्या म्हणाल्या. पुढं आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाविषयी त्या म्हणाल्या की, आढळराव पाटील हे कोणाशीही प्रामाणिक राहिलेले नाही. तसंच राष्ट्रवादी अरेरावी करत आहे, दमदाटी करत आहे, म्हणून बाहेर पडलेले वळसे पाटील आज अजित पवार यांच्याबरोबर गेले आहे. पण काहीही झालं तरी शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हे हेच विजयी होणार असल्याचं यावेळी अंधारे म्हणाल्या.
प्रकाश आंबेडकरांच्या टीकेलाही दिलं प्रत्युत्तर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावर प्रत्युत्तर देत अंधारे म्हणाल्या की, "वंचित बहुजन आघाडीला कायम चर्चेला बोलावलं गेलं. आज आघाडी तोडण्यासाठी संजय राऊत यांच्या नावानं बिल फाडलं जातंय. महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलावल्यानंतर ते कायम तिसऱ्या, चौथ्या फळीमधील लोकांना पाठवत होते. तसंच आंबेडकर यांनी केलेल्या कोणत्याही वाक्याचा नीटसा अर्थ लागत नाही", असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा -
- ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंवर शिवसेना महिला नेत्यानं फेकली चप्पल, देव-देवतांचा अपमान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
- जराही नैतिकता उरली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा- सुषमा अंधारे
- कल्याण विधानसभा लढवणार नसल्याचं सुषमा अंधारे यांचं स्पष्टीकरण, उदयनराजेंच्या अगतिकतेवर टीका