मुंबई Sunil Tatkare on Ajit Pawar: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बघायला मिळाला. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना यश मिळालं तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'तेव्हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक झाली' अशी कबुली एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिलीय. अजित पवार यांनी त्यांची भावना व्यक्त केली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
काय म्हणाले सुनील तटकरे? : अजित पवारांच्या वक्तव्यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना सुनील तटकरे म्हणाले की, "अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनौपचारिक केलेलं नाही. त्यांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलंय. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे. यातून दादा इज दादा आणि दादा इज ग्रेट हे सिद्ध झालंय." पुढं विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत. महायुती सरकारनं घोषित केलेल्या योजनांमुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आमच्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत."