सुनेत्रा पवारांकडून बारामती लोकसभेची मोर्चेबाधणी? दौंड (पुणे) Sunetra Pawar visited MLA Rahul kuls Home : बारामती लोकसभा निवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढविणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल यांच्या घरी भेट दिलीय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही भेट महत्वपूर्ण समजली जातेय. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय.
दोंड इथल्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय. दौंड इथल्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतलीय. यावेळी आमदार राहुल कुल, त्यांच्या पत्नी कांचन कुल तसंच आमदार राहुल कुल यांच्या मातोश्री तथा माजी रंजना कुल यादेखील उपस्थित होत्या. या भेटीत सुनेत्रा पवार यांनी जेवणाचादेखील आस्वाद घेतला.
बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत : लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निवडणुकांसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसंच शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे. अशातच बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडं संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. अशातच सुनेत्रा पवार यांनी कुल कुटूंबियांची भेट घेतल्यानं राजकीय घडामोडींना वेगल आला आहे.
लोकसभेची मोर्चेबांधणी सुरु : मागील लोकसभेला भाजपाकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणुक लढविली होती. त्यामुळं या भेटीला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी सुमारे तीन तास बंद दाराआड चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भेटीमुळं सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची मोर्चेबांधणी तर सुरु केली नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय.
हेही वाचा :
- अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक, सुप्रिया सुळे यांनी केली 'ही' मागणी
- मंत्रालय परिसरात लागलं सुनेत्रा पवारांचं 'भावी खासदार' बॅनर; राजकीय चर्चांना उधाण