कोल्हापूर : लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली होती. यावेळी या सभेनंतर सातारा लोकसभेचा नूरच पालटला आणि श्रीनिवास पाटील यांनी विजय संपादन केला होता. याच सभेची पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली. कोल्हापुरातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यासाठी शरद पवारांनी आज (15 नोव्हेंबर) भर पावसात सभा घेतली. ही सभा गेम चेंजर ठरणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सभांचा धडाका : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 3 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांची सभा संपल्यानंतर शरद पवारांनी सहकार पंढरी कोल्हापुरात तीन सभांचं नियोजन केलं होतं. यातील पहिली सभा इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित करण्यात आली होती.
शरद पवारांची मुसळधार पावसात सभा : शरद पवारांचं दोन वाजून पंधरा मिनिटांनी व्यासपीठावर आगमन झालं, याआधी इचलकरंजी शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसत होत्या. मात्र, सकाळपासून शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी थांबलेल्या मतदारांनी शरद पवार व्यासपीठावर आल्यावर एकच जल्लोष केला. यानंतर शरद पवार भाषणाला उभे राहिले, यावेळी इचलकरंजीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, पवारांनी भाषण न थांबवता आलेल्या लोकांना संबोधित केलं.