साताराLok Sabha Election 2024 : महायुतीची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. दिल्लीला गेल्यानंतर उदयनराजेंना भाजपा नेतृत्वानं चार दिवस ताटकळत ठेवल्याबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी खास आपल्या शैलीत खोचक टिपण्णी केली. राजाबद्दल प्रजेनं काय सांगायचं. त्यांची एकंदर स्थिती काय आहे, ते तुम्हाला दिसतेयच, अशा शब्दांत त्यांनी उदयनराजेंबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच आम्हाला खात्री आहे की, लोकांच्यात गेल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आस्था बघायला मिळेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिवर्तनाच्या तयारीत: राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठबळ देणाऱ्या सातारा जिल्ह्याबद्दल शरद पवार म्हणाले, साताऱ्याचं वैशिष्ट्य आहे की सातारा नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारा जिल्हा आहे. स्वातत्र्य चळवळीत योगदान देणारा जिल्हा आहे. स्वातत्र्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, अशा कर्तृत्ववान लोकांची फळीच इथं होऊन गेली. त्यांच्या विचारांचा पगडा आजही सामान्य लोकांवर आहे. आज देशात जे काही घडतंय. त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीनं इंडिया आघाडीच्या मार्फत जे प्रयत्न सुरू आहेत. त्याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा अग्रभागी आहे. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आमचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम आज सातारकरांनी केलंय.
नाणं खणखणीत असल्यानं चिंता नाही: आमदार शशिकांत शिंदेंवर सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांसदर्भात छेडलं असता शरद पवार म्हणाले, आरोप करणाऱ्यांकडे शशिकांत शिंदेंच्या कामाबद्दल सांगण्यासारखं दुसरं काही नाही. लोकांचा शिंदेंना प्रतिसाद मिळणार, याची त्यांना खात्री असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्याने जातायत. स्वतंत्र पत्रकार परिषद घेउन सर्व परिस्थिती लोकांसमोर ठेवा, असं मी शशिकांत शिंदेंना सुचवलं आहे. ते उद्या (मंगळवारी) खुलासा करणार आहेत. आपलं नाणं खणखणीत असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.