पुणे Sharad Pawar On Government : पुण्यातील काँग्रेस भवन येथे आज (24 फेब्रुवारी) महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला सुनावलं. "सरकारला जर शेतकऱ्यांची काळजी नसेल तर या सरकारला आणि राज्यकर्त्याला उपटून फेकावं लागेल," असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा: यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत शरद पवार म्हणाले की, "मोदींच्या राज्यात नेत्यांची भूमिका वेगळ्या वळणाला जात आहे. अलीकडंच मोदींचं भाषण बघितलं त्यामध्ये ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतांना दिसले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी केलेलं कार्य संपूर्ण देश मान्य करतोय. पण पंतप्रधान मोदी नाही. त्यांना हातात माईक मिळाला की ते नेहरुंवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू करतात", असा टोला पवारांनी लगावला.