पुणे Sanjay Raut On Rahul Narwekar : लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी पक्षांतर बंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड", राहुल नार्वेकरांवर संजय राऊतांचा हल्लाबोल - संजय राऊत
Sanjay Raut On Rahul Narwekar : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल नार्वेकर यांची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. दरम्यान, यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
Published : Jan 29, 2024, 2:12 PM IST
काय म्हणाले संजय राऊत :यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, "अरे बापरे! हा तर देशातील सर्वात मोठा फ्रॉड आहे. या माणसाने 10 पक्षात पक्षांतर करुन ते पचवलं. ढेकरदेखील घेतली आहे. ज्या व्यक्तीनं शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, अशा व्यक्तीची राजकीय पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड होत असेल तर तो काय महान माणूस आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनंतर हेच घटनाकार यांना सापडले आहेत. ओम बिर्ला हे संविधानाचा अपमान करत आहेत", अशी टीका यावेळी राऊत यांनी केली आहे.
रवींद्र वायकर ईडी चौकशीवरही दिली प्रतिक्रिया : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीनं आज चौकशीसाठी बोलावलं आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "जे लोक अशा कारवाईला घाबरत होते, ते पळून गेले आहेत. नितेश कुमारदेखील बाहेर पडले आहे. त्याला देखील हेच कारण आहे. रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर,आणि माझ्या भावालादेखील नोटीस आली आहे. लहान-लहान गोष्टी या बाहेर काढल्या जात आहेत. ईडी ही भाजपाची एक ब्रांच आहे. जे भाजपाबरोबर नाही, त्यांना अशा पद्धतीनं त्रास दिला जातं आहे."
दरम्यान, पुढे मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटप ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "फॉर्म्युला नाही त्याला आम्ही योग्य जागा वाटप म्हणतो. ज्या जागांवर सध्याचे खासदार आहेत, त्यावर फार चर्चा करायला नको. आम्ही सगळ्यांना सोबत घेत आहोत. आमची राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आम्ही संभाजीराजे यांच्याशीदेखील चर्चा करू. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. त्याबाबत राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत."
हेही वाचा -