मुंबई Rohit Pawar criticized Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी (9 जून) सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी राज्यातील 6 खासदारांनी शपथ घेतली. मात्र, या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद मिळालं नाही. यावरूनच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना डिवचलंय.
- भाजपानं लोकसभेपुरता अजित पवारांचा वापर करून घेतला. येत्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवारांकडं राहणार नाही. भाजपाच्या चिन्हावर लढायचं हा एकच पर्याय त्यांच्याकडं असेल, असा आमदार रोहित पवार यांनी केला.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार? : प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधत रोहित पवार म्हणाले की, "राज्यसभेदरम्यान देखील मंत्रिपद मिळवण्यावरुन असाच वाद झाला होता. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी हात धुवून घेतले होते. चार वर्षांचा कार्यकाळ असतानादेखील त्यांनी सहा वर्षांचा कार्यकाळ घेतला. अजित पवार यांना तेव्हा काहीच मिळालं नाही. आता देखील प्रफुल्ल पटेल यांच्यामागील ईडीची कारवाई टळली. मात्र, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावरील कारवाया तशाच चालू आहेत. त्यामुळं शरद पवार यांना सोडून जे नेते महायुतीत गेले, त्यात सर्वात जास्त फायदा प्रफुल्ल पटेल यांचाच झालाय. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो."
पुढं ते म्हणाले की, "अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता मंत्रिपद दिलं जाणार नसेल तर त्याचा एकच अर्थ आहे की, हा पक्ष आता अजित पवार यांच्याकडं राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्याशिवाय अजित पवारांकडं पर्याय राहणार नाही," असा दावा रोहित पवार यांनी केला.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? :सुरुवातीला मंत्रिमंडळात माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्यानंतर याविषयी स्पष्टीकरण देत प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "भाजपाकडून माझ्या नावाबाबत निरोप मिळाला. मात्र, मी यापू्र्वी भारत सरकारमध्ये मंत्री राहिलोय. त्यामुळं, स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात काही भाजपाच्या श्रेष्ठींची काही चूक आहे किंवा नाही, असं नाही. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) 7 खासदार निवडून आलेत. त्या पद्धतीनं त्यांना ज्या सूचना मिळाल्या, त्याच पद्धतीनं आम्हालाही मिळाल्यात. तुम्ही थोडे दिवस धीर ठेवा, हेही आम्हाला सांगण्यात आलंय," असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -
- मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात केवळ 7 महिला मंत्र्यांचा समावेश - PM Modi New cabinet
- नरेंद्र मोदींची हॅट्रिक; चहा विक्रेता ते तीनवेळा पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास वाचा एका क्लिकवर - Narendra Modi PM Oath Ceremony
- नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, 71 नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश, वाचा संपूर्ण लिस्ट - Narendra Modi Takes Oath as PM