महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 3:20 PM IST

ETV Bharat / politics

चंद्रकांत हंडोरे पुन्हा अडचणीत येणार का? विधिमंडळ बैठकीला काँग्रेसच्या आमदारांची अनुपस्थिती

Rajya Sabha Election 2024 : काँग्रेस विधिमंडळ पक्षाची तातडीची बैठक आज (15 फेब्रुवारी) विधिमंडळात पार पडली. या बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी चंद्रकांत हंडोरे यांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात उपस्थित आमदारांच्या संख्याबळावर हंडोरे निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळं राज्यसभेच्या निवडणुका झाल्यास हंडोरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई Rajya Sabha Election 2024 :राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी येत्या 27 तारखेला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रिक्त झालेल्या तीन जागांसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीनं प्रफुल पटेल यांना पुन्हा पसंती देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या वतीनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत विधानसभेतील सदस्य हे मतदान करू शकतात. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 40.41 एवढी मतांची टक्केवारी अपेक्षित आहे. पहिल्या पसंतीची एवढी मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो विजयी होईल. तर अद्यापही भारतीय जनता पार्टीनं चौथा उमेदवार दिलेला नाही. जर भाजपानं चौथा उमेदवार या निवडणुकीत उतरवला, तर मात्र निवडणुका होतील, अन्यथा सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येतील.

महायुतीकडं पुरेसे संख्याबळ :या निवडणुकीत महायुतीच्या वतीनं पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत. महायुतीकडे सध्या पुरेसे संख्याबळ असल्यानं हे पाचही उमेदवार सहज निवडून येतील अशी अपेक्षा आहे. जर त्यांनी सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर मात्र त्यांना कसरत करावी लागणार आहे, आणि त्यासाठी कदाचित भारतीय जनता पार्टी चौथा उमेदवार देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस पुन्हा अडचणीत :काँग्रेसच्या वतीनं यावेळेस चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे. हंडोरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत आश्चर्यकारकरित्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पुरेसे संख्याबळ असतानाही आयत्या वेळेस अशोक चव्हाण गटानं त्यांना मदत न केल्यामुळं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याची भरपाई म्हणून पक्षानं पुन्हा एकदा त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडं असलेल्या 42 आमदारांच्या संख्याबळावर चंद्रकांत हंडोरे हे निश्चितपणे निवडून येतील अशी शक्यता आहे. मात्र, आज झालेल्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या तातडीच्या बैठकीला सहा आमदार गैरहजर राहिले होते. हे सहा आमदार वगळले तर काँग्रेसकडे 36 इतकेच संख्याबळ उरते, अशा स्थितीत हंडोरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही :या गैरहजर असलेल्या सहा आमदारांपैकी काही आमदारांनी गैरहजर असण्याची कारणं पत्राद्वारे दिली आहेत. मात्र, तरीही झीशान सिद्दिकी, अमित देशमुख, जितेश अंतापुरकर आणि माधवराव जवळगावकर या चार आमदारांची शाश्वती पक्षाला देता येईल की नाही याबाबत शंकाच आहे. तसं झाल्यास पुन्हा एकदा काँग्रेसला संख्याबळ असतानाही पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. मात्र, या संदर्भात बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, "सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. काही वैयक्तिक कारणामुळं त्यांना आजच्या बैठकीला उपस्थित राहता आलं नाही. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही", असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा -

  1. काँग्रेस विधिमंडळ बैठकीला सहा आमदार गैरहजर: 'ते' आमदार भाजपाच्या संपर्कात?
  2. राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल काय म्हणाले अशोक चव्हाण?
  3. राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, 'आयारामांचं' नशिब फळफळलं; अजित पवार गटाचे मात्र 'वेट अ‍ॅंड वॉच'

ABOUT THE AUTHOR

...view details