मुंबई Raj Thackeray Maratha Reservation :मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं मराठा आरक्षणाची घोषणा केली. सरकारनं त्या संदर्भातील अधिसूचनाही काढली आहे. आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना ओबीसींचे लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यासह मराठ्यांना ओबीसींच्या सर्व सवलतीही दिल्या जाणार आहेत. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक मराठा नेत्यांनी सरकारच्या या घोषणेचं स्वागत केलं, तर छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांनी याचा विरोध केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंनी 'X' वर पोस्ट करत मनोज जरांगेंचं अभिनंदन केलं. मात्र आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सरकारला टोला मारला आहे. राज ठाकरे मनोज जरांगे पाटलांना उद्देशून म्हणाले, "सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल. लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा."