मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक आता तोंडावर आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून केव्हाही आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. अशातच विविध राजकीय पक्षांनी मेळावे घेण्यास सुरुवात केली असून, शनिवारच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर आज (13 ऑक्टोबर) राज ठाकरे यांनी राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असून, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. सोबतच राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांचा संदर्भ देत या देशानं जसं निर्मळ मनाच्या उद्योजकावर प्रेम केलं, तसं राजकारण्यांवर प्रेम का नाही? असा प्रश्न देखील विचारला. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यावर देखील राज ठाकरे यांनी टीका केली.
निष्ठा नावाचा प्रकारच राहिलेला नाही : शनिवारी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका केली. त्यावेळी त्यांनी अमित शाह व नरेंद्र मोदी यांना मोघलांची उपमा दिली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांवर टीका केली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "निष्ठा नावाचा प्रकारच राहिलेला नाही. आता मी दौऱ्यावर होतो, त्यावेळी आम्हाला विचारावं लागत होतं हा माणूस, नेता आता कोणत्या पक्षात आहे. त्यावेळी कार्यकर्ते सांगायचे, हा आता तुतारी सोबत आहे आणि तो भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हा भाजपमध्ये होता आता तुतारी सोबत आहे. आणि पुढे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशी सर्व परिस्थिती महाराष्ट्रात आहे." असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि महायुतीला टोला लगावला.