कराड- मोदी, शहा आणि अदानी यांनी नकळत मुंबई हातात घेतली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपानं महाराष्ट्राला छळले असून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला नेले. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, " महाराष्ट्राचा सरकारी मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत. आम्ही आवाज उठवल्यानंतर मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढतो, म्हणून सांगितले. ती श्वेतपत्रिका कुठाय?", असा सवाल केला. आमचे सरकार आल्यानंतर विकासकामांच्या बोगस टेंडरची चौकशी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
मुंबईचे अर्थिक विकास केंद्र गुजरातला पळवले-कराड दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी निर्धार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, " भाजपाच्या नेत्यांनी मुंबईचे आर्थिक विकास केंद्र गुजरातला पळवले. कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले असताना हा निधी मोदींनी बुलेट ट्रेनला वळवला. पालघर जिल्ह्यात होणारी मरीन अकॅडमी मोदींनी द्वारकेला पळवली. मात्र, राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना विरोध केला नाही."
बोगस टेंडर काढून विकासाची पोस्टरबाजी-पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "महायुती सरकारनं बोगस टेंडर काढून विकासाची पोस्टरबाजी सुरू केली. आमचे सरकार आल्यानंतर या सर्व प्रकारांची चौकशी केली जाणार आहे. ही निवडणूक राज्याच्या भवितव्याची आहे. भाजपाचे सरकार आपल्या डोक्यावर घ्यायचे आहे का? पुन्हा वर्णव्यवस्था लादून घ्यायची का, याचा गांभीर्यानं विचार करा. मी जगातील अनेक देशांचा आणि भारतातील राज्यांचा विकास बघितला आहे."
आम्ही राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याची योजना, १०८ रुग्णवाहिकेची योजना आणली. भाजपानं त्यांची नावे बदलली-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पृथ्वीराज चव्हाण
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार- "कराड दक्षिणमध्ये पैशाचा वारेमाप वापर होईल. कोणी खोटी आश्वासने देवून निघून जाईल. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या आशीर्वादाने मी खासदार, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री झालो. हे मी कधीच विसरणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कराड दक्षिणच्या विकासाला साथ देउन इतिहास घडवूया," असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.
हेही वाचा-
- भाजपामध्ये नाराजी नाट्य; वडिलांना उमेदवारी मिळाल्यानंतरही नाराज, संदीप नाईक घेणार तुतारी
- विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकरांसह 'या' नेत्यांचा आहे समावेश