महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दुटप्पी? काय म्हणाले राजकीय विश्लेषक? - Vanchit Aaghadi - VANCHIT AAGHADI

Vanchit Aaghadi : मागील म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनं स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. मात्र, वंचित बहुजन आघाडीनं बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. त्याबाबत राजकीय विश्लेषण जाणून घेऊ.

Supriya Sule
वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 9:39 AM IST

Updated : Apr 3, 2024, 12:42 PM IST

पुणे Vanchit Aaghadi : "सगळे मिळून लढू... पण लढण्याची तयारी ठेवा" असं म्हणणारे वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आता 'एकला चलो'चा नारा दिला असून महाविकास आघाडीमध्ये ते सहभागी होणार नसल्याचं आत्ता स्पष्ट होत आहे. 2019 मध्येही आंबेडकर वेगळं लढल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना याचा फटका बसला होता. यंदाच्या या निवडणुकीतदेखील आंबेडकर यांच्या वंचितचा फटका मविआला बसणार आहे. आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका ही दुटप्पी भूमिका असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

विरोधी आघाडीत सहभागी होण्याची इच्छा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातील सर्वच विरोधकांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडी केली. या 'इंडिया' आघाडीत आम्हाल देखील यायचंय, असं म्हणत राज्यात विरोधकांनी एकत्र केलेल्या महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीलादेखील सहभागी व्हायचं आहे. मात्र आम्हाला तशा चर्चेला बोलावलं जात नाही, असं एक ते दीड महिन्यापूर्वी वंचितचे नेतेमंडळी सांगत होते. देशातील विरोधकांनी एकत्र येत सगळ्यांनी मिळून लढल पाहिजे, अशी भूमिका तेव्हा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती.

'एकला चलो'चा नारा : देशासह राज्यातील विविध संस्था, संघटना आणि पक्ष इंडिया आघाडी तसंच मविआमध्ये सहभागी होत असताना महविकास आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला देखील बोलवण्यात आलं. तिथून चर्चा सुरू होऊन जागावाटपापर्यंत येऊन थांबली. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला मविआनं दोन जागेचा प्रस्ताव दिला होता. पण तेव्हा वंचितनं 7 जागेचा प्रस्ताव दिला होता. ही चर्चा होत असताना दोघंही आपल्या प्रस्तावावर ठाम असताना वंचितनं लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासह 9 जणांची उमेदवारी जाहीर केली. आम्हाला संविधानासाठी एकत्र यायचं आहे, अशी भूमिका घेणाऱ्या आंबेडकरांनी आता घेतलेली भूमिका लोकांना न पटणारी आहे. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात पाठिंबा दिला आहे. त्यचा फटका वंचितलादेखील बसणार असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.

प्रकाश आंबेडकरांना मवि मध्ये रस नाही : याबाबत ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक राजेंद्र पाटील म्हणाले की, "2024 च्या लोकसभेचं वातावरण तयार झाल्यावर वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेईल, याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होत. असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी बरोबर युती करण्याची सर्व पावलं उचलली. शिवसेनेबरोबरची वंचितची युती फक्त नावालाच झाली. कुठंही कार्यक्रमात, प्रचारात शिवसेना आणि वंचितची युती पाहायला मिळाली नाही. आता देखील यंदाच्या या लोकसभा निवडणुकीत माविआ बरोबर अनेक बैठका झाल्या. पण जेव्हा जागावाटपाचा विषय आला तेव्हा अनेक अटी आणि अनेक जागा आंबेडकर यांनी सांगितल्या. शेवटी 2019 प्रमाणेच आंबेडकर यांनी उमेदवार जाहीर केले. यातून एकच स्पष्ट होतं की आंबेडकर यांना मविआबरोबर रसच नाही."

2019 सारखा फटका बसण्याची शक्यता : ते पुढे म्हणाले की, "जो प्रकार 2019 ला झाला, तोच आतादेखील प्रकार होणार आहे. तेव्हा देखील वंचितचा फटका हा काँग्रेसच्या उमेदवारांना बसला होता. तसाच फटका आतादेखील बसू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे 2019 ला प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव विषयी भूमिका घेतली होती. त्यामुळं त्यांच्या बाजूनं वातावरण तयार झालं होतं. पण आता मात्र ते वातावरण नसल्यानं वंचितचा फटका त्यांनादेखील बसणार असल्याचं यावेळी पाटील यांनी सांगितलं.

वंचितचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा :वंचितनं राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांपैकी अत्यंत चुरशीच्या अशा बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत याठिकाणी होत असताना वंचितनं सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलाय. वंचितच्या या भूमिकेबद्दल राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्या तरी याबद्दल बोलताना वंचितचे प्रदेशचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे म्हणाले की, "आमच्या भूमिकेबद्दल कोणालाही संशय घेण्याचं काही कारण नाही. सुप्रिया सुळे यांना आम्ही उघड पाठिंबा जाहीर केलेला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वात अगोदर त्या महिला आहेत. दुसरं कारण म्हणजे सतत तीन वेळा त्यांना संसद रत्न हा पुरस्कार भेटला आहे. त्यांचं नेतृत्व सक्षम आहे. अशा परिस्थितीत अशा कर्तृत्ववान महिलेच्या पाठीशी उभं राहणं, हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो. म्हणूनच बारामती सुप्रिया सुळे यांना आम्ही बिनशर्त पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय."


सुप्रिया सुळेंचं पारडं जड : बारामती लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची असली तरी काका शरद पवार व पुतण्या अजित पवार कुटुंबासाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढवणार असून दुसरीकडे त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना 6,86,714 मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपाच्या कांचन कुल यांना 5,30,940 मतं मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांना 44,134 मतं मिळाली होती. सुप्रिया सुळे यांच्या मतांची टक्केवारी ही 52.63 टक्के इतकी होती. कांचन कुल यांच्या मतांची टक्केवारी 40.69 टक्के होती. तर वंचितचे नवनाथ पडळकर यांच्या मतांची टक्केवारी 3.38 टक्के होती. याचाच अर्थ बारामती मतदारसंघात वंचितचा प्रभाव हा 3 ते 4 टक्के असला तरी ही मतांची टक्केवारी फार महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत यंदा प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दिल्यानं नक्कीच सुप्रिया सुळे यांचं पारडं जड झालंय.

हेही वाचा :

  1. 'वंचित'कडून अविनाश भोसीकरांना उमेदवारी; काँग्रेस भाजपा उमेदवाराची धाकधूक वाढली, दगाफटका कोणाला? - Lok Sabha Election 2024
  2. अमरावतीत आंबेडकर बंधुची खेळी; 'वंचित'चा आनंदराज यांना बिनशर्त पाठिंबा - LOK SABHA ELECTIONS
Last Updated : Apr 3, 2024, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details