मुंबई PM Narendra Modi In Mumbai : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलय. विधानसभेनंतर लगेचच मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याचं बोललं जातंय. अशातच लोकसभा निवडणुकीनंतर 13 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामांचं भूमिपूजन करणार आहेत. त्यामुळं मोदींचा मुंबई दौरा म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचं भूमिपूजन तर नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
'या' प्रकल्पांचं करणार भूमिपूजन :राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 12 जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जुलै रोजी पंतप्रधान मोदी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी काळात येऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली-ठाणे लिंक रोड, दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच तिन्ही प्रकल्पांचं भूमिपूजन करणार आहेत.
पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. त्या प्रकल्पातील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची किंमत 6300 कोटी रुपये असून, बोरिवली-ठाणे लिंक रोड प्रकल्पाची किंमत 8400 कोटी रुपये आहे. सोबतच दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते ग्रँट रोड या उन्नत रस्त्याचं भूमिपूजनही पंतप्रधान करणार असून, या प्रकल्पाची किंमत 1170 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतय. 13 जुलै रोजी विविध प्रकल्पांच्या भूमिपूजना नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सभेला संबोधित करणार आहेत.
किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया :या संदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केलं जातय. याचा अर्थ इथले सध्या पदावर असलेले नेते कुठेतरी कमी पडतायत. बृहन्मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका नाही. महाराष्ट्रात अशा सतरा महानगरपालिका आहेत. देशात किती असतील याचा विचार करा. मात्र, पंतप्रधान केवळ मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी इकडे येतात. लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधानांनी 17 वेळा महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात 4 वेळा ते मुंबईला आले. आता पुन्हा महानगरपालिकेच्या कामांच्या भूमिपूजनासाठी ते मुंबईत येत आहेत. यातून या लोकांना नेमकं काय साध्य करायचंय?".
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजना सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेच्या देखील विविध प्रकल्प आणि योजनांचं लोकार्पण करणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आलीय. मात्र, हे प्रकल्प कोणते आहेत याची माहिती अद्याप रेल्वेकडून देण्यात आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, 'या' प्रकल्पांचं करणार भूमिपूजन - PM Modi Mumbai Visit - PM MODI MUMBAI VISIT
PM Narendra Modi In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (13 जुलै) मुंबईत येत असून त्यांच्या हस्ते महापालिकेच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौरा (ETV Bharat)
Published : Jul 12, 2024, 2:01 PM IST
हेही वाचा -
- जिगरी दोस्ताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत; राष्ट्राध्यक्षांनी मित्रासाठी चालवली इलेक्ट्रीक कार - Pm Modi Russia Visit
- पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी रवाना; 'असा' असेल दौरा - MODI on RUSSIA AUSTRIA TOUR
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी द्विपक्षीय बैठकी पुन्हा सुरू करणार - Russia India Meeting