नाशिक PM Narendra Modi in Nashik : राज्यात पाचव्या टप्प्यात निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचलाय. याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथं भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांच्यासाठी प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी काहीजणांकडून कांद्याविषयी बोला अशी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मोदींनी कांद्यावरही भाष्य केलं. नुकतंच जिरेटोपावरुन मोदींच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना यावेळी सभेमध्ये मोदींनी चक्क गांधीटोपी परिधान केली होती. त्याची चर्चाही लोकांमध्ये होती.
आम्ही 60 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला :या सभेतकाहीजणांकडून कांद्याविषयी बोला अशी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मोदींनी कांद्यावरही भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "कांदा स्टॉक करण्याचं काम आम्ही सुरु केलं. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढलाय. निर्यातीसाठी आम्ही अनुदान देखील दिलंय."
विरोधी पक्षनेता होणंही अवघड : या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए आघाडीला किती मोठं यश येत आहे याची जाणीव त्यांच्या एका बड्या नेत्याच्या वक्तव्यातून कळतं. इंडिया आघाडीचा मुख्य पक्ष हा काँग्रेस आहे. काँग्रेस इतक्या वाईट पद्धतीनं हारणार आहे की, त्यांना विरोधी पक्ष होणं देखील कठीण आहे. त्यामुळं इंडिया आघाडीचे इथले नेता आहेत, त्यांनी सर्व लहान पक्षांना निवडणूक संपल्यानंतर काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असं म्हटलंय. याचा अर्थ त्यांनी आपापली दुकानं बंद करावी. कारण त्यांना वाटतं ही सर्व दुकानं एकत्र झाली तर कदाचित ते विरोधी पक्ष बनतील. त्यांची अशी परिस्थिती आहे."