मुंबईDhangar Community Reservation :गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सत्ताधारी पक्षासोबत जाणं पसंत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. तेव्हापासून दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू असते. खरं तर आता पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांना पवारांच्या राष्ट्रवादीत खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आपल्या पक्षात येण्याचं आवाहन केलय. तसंच जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या ऑफरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आव्हाडांचाही धनगरांच्या आंदोलनाला पाठिंबा :धनगर समाजाने आदिवासी समाजातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावरूनच आता आदिवासी समाजाच्या राज्यातील आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली आमदार निवास ते मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून बेमुदत आंदोलन केलं होतं. सदर आंदोलनात राज्यातील आदिवासी समाजाचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच आमदार उपस्थित होते. मोर्चा गांधी पुतळ्याकडे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपली गाडी थांबवत आपलादेखील धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी त्यांनी नरहरी झिरवळ यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या, अशा प्रकारचं आवाहन केलंय.
त्यांनी त्यांचं मत मांडलं - झिरवळ : जितेंद्र आव्हाडांच्या आवाहनावर नरहरी झिरवळ म्हणाले की, त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे, त्यावर मी काय बोलणार, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. एका बाजूला नरहरी झिरवळ संविधानिक पदावर असताना आदिवासींच्या हक्कासाठी सरकार दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी न्याय मागत आहेत. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या स्वगृही परतण्याबाबतच्या आवाहनामुळे नरहरी झिरवळ अजित पवारांच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात नरहरी झिरवळ यांच्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.