कोल्हापूर MP Shrikant Shinde Emotional : कोल्हापुरात शिवसेनेचं (शिंदे गट) राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. लहानपणापासून आतापर्यंत अनेक वेळा तक्रार करायचो आम्हाला वेळ कधी देणार, लोकांच्या व्यापातून या तक्रारीला कधीच उत्तर मिळालं नाही. अनेक जण माझा बाप चोरला म्हणून तक्रार करत आहेत. मात्र, लोकांच्या केलेल्या कामातून आज एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला आणि तो माझा बाप आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचं सांगत खासदार श्रीकांत शिंदे भावनिक झाले.
मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावून काम करत आहेत : अधिवेशनात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे पुढं म्हणाले की, "शिवसेनेमध्ये सर्वोच्च पद कोणा एकासाठी राखीव नाही. 'ना सोऊंगा ना सोने दुंगा' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ब्रीद वाक्य आहे. फक्त माझे कुटुंब म्हणजे माझी जबाबदारी नाही, तर माझा महाराष्ट्र म्हणजे माझी जबाबदारी असं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत केलंय. सिर्फ राजा का बेटा राजा नही होगा, जो मेहनत करेगा, वही राजा बनेगा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री आहेत. शिवसेना तळागाळात घेऊन जात कार्यकर्त्यांना त्यांनी कधी मरु दिलं नाही त्यांना जगवण्याचं काम केलं. म्हणून आजही कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी मुख्यमंत्री शिंदे पायाला भिंगरी लावून काम करतात."