नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते कडाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर "झुटों के सरदार है", त्यांनी सर्वत्र खोट्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर न्यायचं : महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहेत. विशेषतः बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती नशाखोरी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. या मुद्यांकडं महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष वेधणार असल्याचं खरगे म्हणाले. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा सत्तेत आल्यापासून ही समस्या वाढल्याचा दावा त्यांनी केला. आम्हाला महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीपथावर न्यायचं आहे. त्यासाठी चांगलं सरकार सत्तेत असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
भाजपा पुन्हा तोडफोड करू शकते : महाराष्ट्रात प्रचार रंगत असताना प्रचारात भाजपाचे मंत्री, मुख्यमंत्री आणि नेते महाराष्ट्रात येत आहेत. पण हेच नेते तोडफोड करण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु आम्ही त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. ज्यांच्याकडं कोणतीही विचारधारा नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचं खरगे म्हणाले.
भाषण देऊन मुद्दे भडकवले जात आहेत : भारतीय जनता पक्षाचे नेते भाषण देऊन लोकांना प्रमुख मुद्यांपासून भटकायचं काम करत आहेत. माझ्यासाठी राजकारणात नवीन नाही. गेल्या ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव माझ्याकडं आहे. मी १३ निवडणूक लढवल्या आहेत. २०१९ची निवडणूक वगळता मी सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. पण अशी परिस्थिती आजवर बघितली नसल्याचं खरगे म्हणाले.