मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मुंबईतील आमदार पुन्हा एकदा मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत. रविवारी (15 डिसेंबर) नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मुंबईतील दोन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागली. मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आशिष शेलार आणि भाजपाचे माजी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळालं.
शिंदेंनी मुंबईतील आमदारांकडे पाठ फिरवली : मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांना या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेलं नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांना बळ देण्यासाठी मुंबईतील आमदारांचा मंत्री पदासाठी विचार करतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी मुंबईतील आमदारांकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय.
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. या महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उध्दव ठाकरेंचा एकछत्री अंमल आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निकराचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाला राजकारणात धोबीपछाड देण्यासाठी आणि मुंबईत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकनाथ शिंदे हे मुंबईतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही.
संघर्ष पाचवीला पुजलेला : मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांपैकी प्रकाश सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "आपण आजपर्यंत संघर्ष करत इथपर्यंत आलो. संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे," अशा शब्दात प्रकाश सुर्वेंनी नाराजी व्यक्त केली. मंत्री पद मिळालं असतं, तर त्याचं सोनं केलं असतं असंही सुर्वे म्हणाले.
मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला अपयश :शिवसेनेला राज्यात चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, मुंबईत त्यांना अपेक्षित असा प्रभाव टाकणारा विजय मिळवता आला नाही. मुंबईतील 36 पैकी 15 जागा भाजपानं जिंकल्या आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाला 10 जागा मिळाल्या तर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 6 जागांवर विजय मिळवता आला आहे. वरळी, शिवडी, माहिम, दिंडोशी, कलिना, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, वांद्रे पूर्व, भायखळा, वर्सोवा या जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. मुंबईतील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जागा मिळवण्यात शिंदेंच्या शिवसेनेला अपयश आलं. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.
महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार : "मुंबई ही शिवसेनेची आहे, बाळासाहेबांची आणि उध्दव ठाकरेंची आहे. त्यामुळं किती काही केलं, तरी हाती काही लागणार नाही, याची त्यांना खात्री आहे. मुंबईतील आमदारांना मंत्रीपद देऊन वाया घालवू नये, असा विचार त्यांनी केला असावा," अशी प्रतिक्रिया शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे आमदार अनील परब यांनी दिली. आम्ही महापालिका निवडणुकीची तयारी जोमात सुरू केली असून महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
- यूपीए-२ च्या पराभवावरून मणिशंकर यांचा गांधी परिवारावर निशाणा, राज्यातील काँग्रेस नेत्यांना काय वाटते?
- राजकारण केले तर राजकीय उत्तर मिळणार-देवेंद्र फडणवीस
- उस्ताद जाकीर हुसैन यांना लहान मुलांशी बोलणं, क्रिकेट पाहणं खूप आवडायचं; श्रीनिवास जोशींनी दिला आठवणींना उजाळा