नागपूर :राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले भाजपाचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृपाशंकर सिंग, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज आणि कैलास विजयवर्गीय हे देखील उपस्थित होते. फडणवीस यांच्या सोबत पूर्व-नागपूर भाजल उमेदवार कृष्णा खोपडे आणि दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नितीन गडकरींच्या निवासस्थानी औक्षण :उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी कांचन गडकरी, अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण केलं. त्यानंतर सर्व नेते मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मार्गस्थ झाले.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची अर्ज भरण्याआधी रॅली (Source - ETV Bharat Reporter) भाजपाचं शक्तीप्रदर्शन : देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी रॅली काढली. हजारोंच्या संख्येनं भाजपाचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. भाजपानं एकप्रकारे या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं आहे.
नाना पटोले कट्टर राहुल गांधी भक्त : "महाराष्ट्राला विकासाची गती दिली आहे. जी प्रगती केली, त्याला कायम सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीचं सरकार येणं हे एकच लक्ष आहे." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "नाना पटोले कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. आरक्षणाबद्दल जी भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली, तीच भूमिका इंदिरा गांधी यांनी घेतली. त्यांची भूमिका राहुल गांधी यांनी कामय ठेवलीय आणि त्याचं समर्थन नाना पटोले करतायत. आरक्षण विरोधी भूमिका परदेशात जाऊन राहुल गांधी मांडतात आणि त्याचं समर्थन नाना पटोले करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. जोपर्यंत भारताचं संविधान आहे आणि भाजपा आहे, तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही."
देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल गुडधे :2009 ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून येथे भाजपाचे प्राबल्य आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी येथून विजयाची हॅट्रिक केली. काँग्रेसकडून माजी नगरसेवक आणि काँग्रेस नेते प्रफुल गुडधे यांना संधी देण्यात आली आहे. प्रफुल गुडधे यांनी 2014 मध्येही फडणवीस यांच्याविरूद्ध काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा
- वरळीत महायुतीकडून मिलिंद देवरांचं नाव चर्चेत, आदित्य ठाकरेंचं काय होणार ?
- जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना; ही तर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी 'मारामारी'
- आमचे चार ते पाच जण निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू; बच्चू कडू कडाडले