महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार; पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठणार? - lok sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Mumbai Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज (17 मे) महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होत आहे. तर बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची भव्य सभा पार पडणार आहे. त्यामुळं सर्वांचंच लक्ष या सभेकडं लागलंय.

lok sabha election 2024 rally of india alliance and mahayuti on today 17th may in Mumbai
बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार (reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 3:31 PM IST

बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार (reporter)

मुंबई Mumbai Lok Sabha :देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रचार सभांचा धुरळा मुंबईत उडत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जाहीर सभा मुंबईतील बीकेसी मैदानात होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सभेदरम्यान इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून काय टीका केली जाईल, याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.


महाराष्ट्रातील प्रचाराचा शेवटचा टप्पा असल्यामुळं मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघावर महाविकास आघाडीनं पूर्ण जोर लावला आहे. इंडिया आघाडीच्या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडी मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी इंडिया आघाडीच्या आजच्या सभेला उपस्थित नसल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे.


जाहीर सभा, संयुक्त पत्रकार परिषद : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती आजच्या सभेत असणार आहे. तर शनिवारी (18 मे) इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे.



पीएम मोदींना काळे झेंडे दाखवणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान मुंबईतील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या जेडीएस पक्षाचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी मतं मागितली होती. प्रज्वल रेवन्नानं शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावर पंतप्रधान बोलायला तयार नाहीत. प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कडक शिक्षा करावी, अशी मागणी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी केलीय. तसंच महिला अत्याचारा संदर्भात मौन बाळगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महायुतीच्या सभेसाठी येत आहेत. त्यावेळी त्यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचा इशारा अलका लांबा यांनी दिलाय.


इंडिया आघाडीच्या सभेत शेवटचं भाषण कोण करणार : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीच्या होत असलेल्या बीकेसी येथील जाहीर सभेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानं सभेची सांगता होणार असल्याचं समजतंय. मात्र, अद्यापही इंडिया आघाडीच्या सभेची सांगता कोण करणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईतील महायुतीच्या सभेपूर्वी पंतप्रधान मोदी 'या' तीन स्मृतीस्थळावर करणार अभिवादन - NDA vs INDIA Bloc in Mumbai
  2. मनमाडने भारती पवार यांना लीड द्यावा... विकास करण्याचं वचन मी देतो; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निवडणूक; ...यांच्यामुळं मोदींना रोडवर उतरावं लागलं?; काय आहेत कारणे? घ्या जाणून - Modi have to come on road in Mumbai

ABOUT THE AUTHOR

...view details