शिंदे गटाचे प्रवक्ते आणि वकील वैजनाथ वाघमारे मुंबई Shivsena Vs Shivsena : शिवसेनेचे एकेकाळचे खंदे सहकारी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात एकमेकांविरुद्ध थंड थोपटून उभे राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या निवडणुकीत आजी-माजी शिवसैनिकांमध्ये लढत होणार आहे. याचाच अर्थ जवळपास 25 टक्क्यांपेक्षा शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देणार आहेत.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 ला स्थापन केलेल्या शिवसेनेचे दोन भाग पडले. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक बंड झाली. पण इतकं होऊनही 'शिवसेना' हा पक्ष म्हणून एकच राहिला. परंतु, याच शिवसेनेचे आता दोन भाग झाले आहेत. 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं दिलेला निर्णय हा शिवसेनेसाठी मोठा झटका होता. आता राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असं चित्र बघायला मिळतंय. या दोन्ही शिवसेना आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमनेसामने आल्या असून या लढाईत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. जाणून घेऊया कुठल्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आपापसात भिडत आहेत.
चंद्रकांत खैरेंच्या साथीला अंबादास दानवे : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दोन जुने मित्र एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. शिंदे गटाचे नेते मंत्री संदिपान भुमरे यांचा सामना उबाठा गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत होत आहे. येथून संदिपान भुमरे यांचा पराभव करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांना अंबादास दानवे यांची लाख मोलाची साथ भेटलीय. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांचा सामना उबाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी होत आहे. त्याचप्रमाणे मावळ मध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांचा सामना उबाठा गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्याशी होत आहे. तर बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध उबाठा गटाचे नरेंद्र खेडेकर असा सामना बघायला मिळतोय.
शिंदेंचे निष्ठावंत विरुद्ध उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत : कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उबाठा गटाकडून वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी दिली गेली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होण्यास उशीर झाल्यानं वैशाली दरेकर यांनी प्रचारात आघाडी घेतलीय. तर दक्षिण मध्य मुंबई मध्ये शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते, विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांचा सामना उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत अनिल देसाई यांच्याशी होत आहे. शिरूर मध्ये शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघंही पूर्वी शिवसेनेतच होते. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिंदेंची साथ धरली.
नारायण राणे घेणार पुत्राच्या पराभवाचा बदला? : केंद्रीय मंत्री, कोकणातील ज्येष्ठ नेते नारायण राणे हे अनेक वर्ष शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या हात धरला, आणि आता भाजपासोबत आहे. त्यांचा सामना उबाठा गटाचे नेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होत आहे. विशेष म्हणजे विनायक राऊत यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकींमध्ये नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा याच मतदारसंघातून दोनदा पराभव केला होता. हातकणंगलेत उबाठा गटाचे सत्यजित पाटील यांचा सामना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्याबरोबर होत आहे. तर यवतमाळ-वाशिम मध्ये उबाठा गटाचे संजय देशमुख विरुद्ध शिंदे गटाच्या राजश्री पाटील अशी लढत आहे.
शिवसेना संपवण्याचं काम : या संदर्भात बोलताना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि वकील वैजनाथ वाघमारे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात चारही बाजूंनी शिवसेना संपवण्याचं काम सुरू आहे. मग ते कुठलेही मोठे पक्ष असतील त्यांनी ठरवून शिवसेना संपवण्याचं काम हाती घेतलंय. मग तो एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल. महाराष्ट्रात 13 ते 14 ठिकाणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमध्येच थेट लढत आहे. परंतु यामध्ये मरण शिवसैनिकांचं होतय. गुन्हे दाखल होतात ते शिवसैनिकांवर, आरोप-प्रत्यारोप होताय ते शिवसैनिकांवर, हे सर्व ठरवून होत आहे. परंतु, हे दोन्ही गटप्रमुखांच्या लक्षात येत नाहीये. तसंच पारंपरिक मतदार सोडून नवीन मतदार आपल्याकडं खेचून घेण्यासाठी दोन्ही गटाकडून कुठलाही प्रयत्न झालेला नाही. एकमेकांवर आरोप करण्यामध्येच दोन्ही पक्ष आपला वेळ वाया घालवताय. अशीच परिस्थिती राहिली तर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही पक्षांची अतिशय बिकट परिस्थिती होईल", असंही वाघमारे म्हणाले.
शिवसेनेचे दोन गट 'या' मतदारसंघात एकमेकांविरोधात भिडणार :
रत्नागिरी - सिंधुदुर्ग : नारायण राणे (भाजप) विरुद्ध विनायक राऊत (उबाठा)
छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरे (शिंदे गट) विरुद्ध चंद्रकांत खैरे (उबाठा)
यवतमाळ - वाशिम : राजश्री पाटील (शिंदे गट) विरुद्ध संजय देशमुख (उबाठा)
बुलढाणा : प्रतापराव जाधव (शिंदे गट) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (उबाठा)
हातकणंगले : धैर्यशील माने (शिंदे गट)विरुद्ध सत्यजित पाटील (उबाठा)
शिर्डी : सदाशिव लोखंडे (शिंदे गट) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (उबाठा)
मावळ : श्रीरंग बारणे (शिंदे गट) विरुद्ध संजोग वाघेरे पाटील (उबाठा)
हिंगोली : बाबुराव कोहळीकर (शिंदे गट) विरुद्ध नागेश आष्टीकर (उबाठा)
शिरूर : डॉ. अमोल कोल्हे (शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (शिंदे सेना)
कल्याण : श्रीकांत शिंदे (शिंदे गट) विरुद्ध वैशाली दरेकर - राणे (उबाठा)
मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे (शिंदे गट) विरुद्ध अनिल देसाई (उबाठा)
हेही वाचा -
- छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'; संदीपान भुमरेंना उमेदवारी - Lok Sabha Election 2024
- 2014 चा 'जुमला' आता 2024 ला 'मोदी गॅरंटी'! राज्यात मोदी गॅरंटी नव्हे तर ठाकरे गॅरंटी चालते, आदित्य ठाकरेंचा दावा - Lok Sabha Election 2024
- मशाल चिन्ह जुलमी, हुकूमशाही राजवट नष्ट करणार, ठाकरे गटाचं 'मशालगीत' लाँच - Lok Sabha Election 2024