कोल्हापूर : सामान्य शिवसैनिक ते आमदार आणि आता राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष या माझ्या प्रवासात सामान्य कार्यकर्ते माता-भगिनी आणि सर्व समाज घटकातील बांधवांच्या पाठबळावर मी यंदाही विधानसभेत पोहोचणार आहे. यापूर्वी दोनदा राजघराण्यातील सदस्याबरोबर माझा सामना झालाय, मात्र जनता या लढाईत माझ्याच पाठीशी उभी राहील. काँग्रेसनं सामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी रद्द करून केलेला अपमान जनता कधीही विसरणार नाही, यामुळं कोल्हापूर उत्तरच्या लढाईत आपण विजयी होणारच, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
यापूर्वी दोनदा झालाय सामना : 2004 विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा राजघराण्यातील सदस्य मालोजीराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 'हात' या चिन्हावर निवडणूक लढवली. शिवसेनेच्या सुरेश साळुंखे यांच्याशी त्यांचा सामना झाला होता. या लढाईत छत्रपती मालोजीराजे निवडून आले होते. यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रिंगणात असलेल्या राजेश क्षिरसागर यांनी मालोजीराजांचा पराभव करत विधानसभेत धडाकेबाज एन्ट्री केली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत थेट राज घराण्यातील सदस्याचा पराभव करून राजेश क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता. तेव्हापासून कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, अडीच वर्षापूर्वी राज्यातील दोन पक्षात पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राजकारणातील सदस्य आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमा छत्रपती यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. आता राजघराण्यातील सदस्याविरोधात लढण्याचा अनुभव असलेल्या राजेश क्षीरसागर यांनी राज घराण्यातील सदस्यांबद्दल आदर आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरातील सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.