मुंबई Jitendra Awhad On Car Attack : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्या गाडीवर आज (1 ऑगस्ट) स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी आव्हाडांनी संभाजीराजेंवर सडकून टीका केली. तसंच यापुढं आपण संभाजीराजेंना मान देऊन बोलणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? : यावेळी बोलत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी संभाजीराजे यांनी गद्दारी केली आहे. यापुढे त्यांना तुम्ही असे म्हणणार नाही. मी मेलो तरी त्यांची माफी मागणार नाही. विरोधात वागणार असतील तर विरोधात बोलणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांचं जे रक्त होतं, ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारं होतं. भांडणं लावणारं रक्त नव्हतं, असा त्याचा अर्थ होता. मात्र, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा एक टक्काही या संभाजींराजेंकडं नाही आहे. जातीजातीत, धर्माधर्मात भांडण लावणारे शाहू महाराजांचे वंशज कसे होतील?", असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. "ज्यांनी दगड मारलाय त्यांना माझी कारवाई व्यवस्थित समजावून सांगेन," असा सूचक इशाराही आव्हाडांनी दिला.