कोल्हापूर : 24 वर्ष शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता ते हातकणंगले विधानसभेचा दोनदा आमदार, जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाचे संचालक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून 'महाशक्ती परिवर्तन आघाडी'त प्रवेश केला आहे. तिसऱ्या आघाडीकडून यंदाच्या विधानसभेसाठी मिणचेकर मैदानात उतरले आहेत. यंदा चार टर्म त्यांच्यासोबत असलेलं पक्षाचं चिन्ह आणि नेताही नसताना हातकणंगलेतील शिवशक्ती-भीमशक्ती आणि आता महाशक्ती या त्रिवेणी संगमावर विजयापर्यंत पोहोचणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. तसंच उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली? याबाबतही मिणचेकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे.
मतदारसंघ पुनर्रचना होण्याआधीचा कोल्हापुरातील वडगाव आणि आताचा हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 1980 पासून सलग पाच वेळा या मतदारसंघात जयवंतराव आवळे यांनी एकहाती निवडून येत वर्चस्व निर्माण केलं. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जन स्वराज्य शक्ती पक्षाकडून राजू किसन आवळे यांनी जयवंतराव आवळे यांच्या एक हाती सत्तेला सुरूंग लावत पहिल्यांदा विधानसभेत एन्ट्री केली होती. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर डॉ. सुजित मिणचेकर यांनी जयवंतराव आवळे यांचे सुपुत्र राजू आवळे यांचा पराभव करत विधानसभा गाठली होती. मिणचेकर हातकणंगले मतदारसंघातून दोनदा निवडून येण्यात यशस्वी ठरले. मात्र, 2019 मध्ये काँग्रेसच्या राजू आवळे यांनी त्यांचा पराभव केला. राज्यात आकाराला आलेल्या महाविकास आघाडीमुळं ही जागा काँग्रेसला गेल्यानं नाराज झालेली मिणचेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र करत छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन महाशक्ती आघाडीत प्रवेश करत ते आता विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध : एक सामान्य शिवसैनिक ते आमदार अशी जिल्ह्याच्या राजकारणात ओळख निर्माण करणाऱ्या मिणचेकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. मात्र, हातकणंगले विधानसभेतील कार्यकर्ते यंदाची विधानसभा लढलीच पाहिजे असा हट्ट धरून बसले आणि मिणचेकर यांचा नाईलाज झाला. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला मिणचेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा करून माझ्या कार्यकर्त्यांसाठी मला हा निर्णय घ्यावा लागेल, असं सांगून मी बाहेर पडलो. मात्र, ठाकरे यांच्याशी माझी नाळ यापुढंही कायम राहणार असल्याचं, सुजित मिणचेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.