सातारा : कराड दक्षिणमध्ये सध्या अखेरच्या टप्प्यातील प्रचारानं वेग घेतलाय. त्यामध्ये स्टार प्रचारकांनी राळ उडवून दिलीय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रचास सभेत माजी मंत्री बंटी पाटलांनी खास कोल्हापुरी स्टाईल भाषण केलं. त्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
जनताच त्यांना रिटायर करेल :पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. परंतु, समोरच्या उमेदवाराकडं सांगण्यासारखं काहीच नाही. मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्या विरोधी उमेदवाराचा यंदा कंडका पाडा, असं कोल्हापुरी स्टाईल आवाहन माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलं. दरम्यान, माजी मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत. जनताच त्यांना रिटायर करेल, असं प्रत्युत्तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलं.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (ETV Bharat Reporter)
कराडची विकासात्मक ओळख पुढे नेली : कराड शहरातील प्रचार सभेत बोलताना बंटी पाटील म्हणाले की, "पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडची विकासात्मक ओळख पुढे नेली. मुख्यमंत्री असताना कराड दक्षिणचा चेहरामोहरा बदलला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच कोणतंही काम त्यांनी डावललं नाही. परंतु, आमची कामं करताना एकनाथ शिंदे यांचा हात जड होतो", असा टोला त्यांनी लगावला.
'या' योजना राबवणार : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बेरोजगारी आणि महागाईला कंटाळलेल्या जनतेचा आक्रोश लोकसभा निवडणुकीत दिसला. सर्व घटकांनी भाजप नेत्यांना पराभव दाखवून काँग्रेस आघाडीला ६५ टक्के कौल दिला. त्याची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल. राज्यात मविआ सरकार आल्यानंतर महिलांना दरमहा तीन हजार रूपये, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, सुशिक्षित तरुणांना भत्ता, या योजना सरकारी तिजोरीवर भार न आणता राबवणार आहोत.
पृथ्वीराज चव्हाणांना जनताच रिटायर करेल : विकासकामे करण्यास पृथ्वीराज चव्हाण सक्षम नाहीत. त्यांचं वय देखील झालं आहे. त्यामुळं जनताच त्यांना रिटायर करेल. अशा लोकांना घरी पाठविण्याशिवाय पर्याय नाही, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. सावंत पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, कामगार हे महायुतीच्या उमेदवाराला निश्चित निवडून देतील. काँग्रेसच्या काळातील एखादी योजना त्यांनी दाखवावी. आम्ही मोदींच्या काळातील योजना दाखवतो, असं आव्हानही त्यांनी दिलं.
हेही वाचा -
- "एक है तो सेफ है"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईतील शेवटच्या सभेतून पुन्हा नारा
- पोस्टरवर मोदींच्या फोटोची गरज नाही; निवडणुकीत केवळ विजय महत्त्वाचा, भाजपा प्रवक्त्याची स्पष्टोक्ती
- मराठवाड्यात विकासाची गंगा आणणार, काश्मीरमध्ये वेगळं संविधान आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी