मुंबई Manohar Joshi Passes Away : माजी लोकसभा अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi Political Role) यांचं आज उपचारादरम्यान निधन झालं. मनोहर जोशी यांना विस्मृतीचाही आजार जडला होता. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतरही मनोहर जोशी (Manohar Joshi Political History) हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले होते. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील त्यांची आढळ निष्ठा त्यांना शिवसेनेपासून दूर करू शकली नाही.
शिवसेनेची स्थित्यंतरं पाहिलेला सैेनिक : महाराष्ट्रात 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' नावाचा आक्रमक पक्ष सुरु केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी प्रभावित होऊन मनोहर जोशी 1967 साली 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट'चे प्रिन्सिपल मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या दादर विभागातून मनोहर जोशी यांनी विधानसभेत नेतृत्व केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आणि सल्लागार म्हणून मनोहर जोशी यांच्याकडं पाहिलं जातं. शिवसेनेमध्ये मनोहर जोशी यांच्या शब्दाला मान आणि आदर मिळाला. शिवसेनेचे 'चाणक्य' अशी त्यांची ओळख कायम राहिली.
1995 मध्ये मुख्यमंत्री : राज्यात शिवसेना-भाजपा युतीची पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री पदासाठी कोण अशी चर्चा सुरू झाली होती. वास्तविक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख मुख्यमंत्रिपद स्वतःकडे घेतात अशी प्रथा असताना, कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी शपथ घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. पहिल्यांदाच एक बिगर काँग्रेसचा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. मात्र, असे असले तरी शपथविधीच्या आदल्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी उठ म्हटल्यानंतर उठणारा आणि बस म्हटल्यानंतर बसणारा असायला हवा. मुख्यमंत्री कोणीही असलं तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडेच राहणार" हे आपल्या 'ठाकरी' शैलीत स्पष्ट केलं होतं.
'या' कारणामुळं जोशी यांचं मुख्यमंत्रिपद गेलं? : बाळासाहेब ठाकरे यांनी "काहीही प्रश्न न विचारता राजीनामा द्या" असं एक पत्र मनोहर जोशी यांना लिहिलं होतं. त्यानंतर लगेच मनोहर जोशी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, जोशी यांच्या एकूणच मुख्यमंत्रिपदाला फटका हा त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्यामुळं बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मनोहर जोशी यांचे जावई बांधकाम व्यावसायिक गिरीश व्यास यांना जोशी मुख्यमंत्री असताना 1995 मध्ये आंदण दिलेला पुण्यातील प्रभात रोडवरील कथित 30 हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट व त्यावरील अकरा मजली बांधकाम बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ही जागा महापालिकेनं ताब्यात घ्यावी, अन्यथा इमारत पाडावी असा आदेशही न्यायालयानं त्यावेळी दिला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 8 ऑगस्ट 1999 रोजी याचिका दाखल केली होती. पालिका शाळेसाठी आरक्षित जागेवर व्यास यांनी नियम धाब्यावर बसवून 22 फ्लॅटची इमारत बांधली व नंतर आरक्षण बदलून घेतलं, असा आरोप होता.