महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शिवसेनेच्या नेत्याला भाजपाची पालघरमधून उमेदवारी; भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता ? - BJP Fake Letter Head

BJP Fake Letter Head : पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपानं प्रकाश निकम यांना उमेदवारी दिल्याचं पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. मात्र हे पत्र फेक असल्याचं समोर आलंय. यानंतर याप्रकरणी अज्ञाताविरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

BJP Fake Letter Head
पालघर मधून प्रकाश निकम यांना उमेदवारी? भाजपाच्या लेटरहेडची काय आहे सत्यता?

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 10:11 AM IST

मुंबई BJP Fake Letterhead : पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यासाठी भाजपाच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार, पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराची घोषणा करणारं बनावट लेटरहेड सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलं होतं. या प्रकरणी स्थानिक भाजपा कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उमेदवारीवरुन महायुतीत मतभेद : महायुतीत जवळपास दहा जागांवर अद्यापही मतभेद आहेत. त्यातील एक जागा म्हणजे पालघर. या जागेवर सध्या शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित विद्यमान खासदार असून, ही जागा आता भाजपाला हवी आहे. या जागेवर राजेंद्र गावित पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागतोय. तर याला भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघड उघड विरोध दर्शवलाय. भाजपा आणि शिंदे गटात या जागेवरुन वाद सुरू असतानाच पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केल्याचं एक लेटरहेड सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलं. त्यामुळं पालघरच्या राजकारणात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल : याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश निकम हे सध्या शिवसेनेत आहेत. मात्र, सोशल मीडियावर प्रकाश निकम यांना उमेदवारी दिल्याचे भाजपाचं लेटरहेड व्हायरल झाल्यानं भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम उडाला. कार्यकर्त्यांनी याचा पाठपुरावा केला असता हे फेक असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर अखेर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे या पत्रावर अरुण सिंह यांची स्वाक्षरी दाखवण्यात आलीय. अरुण सिंह हे भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी आहेत. त्यामुळं अनेकांनी या लेटरहेडवर लगेचच विश्वास ठेवला. मात्र आता हे लेटरहेड फेक असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पालघर लोकसभा मतदारसंघावरुन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरु असतानाच हे फेक लेटरहेड व्हायरल झालंय. त्यामुळं या सर्व गदारोळात या जागेवर आपला उमेदवार उभा करण्यात महायुतीचा कोणता पक्ष बाजी मारतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. देशात मोदींची क्रेझ असल्याच्या भ्रमात राहू नका, नवनीत राणा यांचं भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन - LOK SABHA ELECTION 2024
  2. भाजपाचं 'संकल्प पत्र' नसून मोदी सरकारची गॅरंटी; देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंतांची गॅरंटी - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details