पालघर :"राज्यात विधानसभेच्या ४० मतदारसंघात शिवसेना महिला आघाडीनं घर न घर पिंजून काढलं आहे," अशी माहिती देताना महायुतीच्या सर्व संकल्पना काँग्रेसनं चोरल्या असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. "१९९९ पासून २०१४ पर्यंत आणि २०१९ मध्ये उद्धव ठाकरे असे आघाडीचे कितीतरी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणीसाठी एक रुपयाही का दिला नाही?" असा सवाल त्यांनी केला. "राज्यात सत्तेत येण्याचे स्वप्न आता महाविकास आघाडीने सोडून देऊन विरोधी पक्षनेता कोण? हे ठरवावे," असा सल्ला त्यांनी दिला.
पालघरमध्ये प्रचार :डॉ. गोऱ्हे यांनी शुक्रवारी पालघर विधानसभा मतदारसंघात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना प्रवक्ते केदार काळे, वैदही वाढान, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
महिलांच्या हिताचे महायुतीचे निर्णय : डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, "महिलांनी कोणतेही आंदोलन न करता महिलांचे प्रश्न कोणते आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विचार करून महिलांच्या विकासाच्या अनेक योजना राबवल्या. महिलांसाठी चौथे धोरण जाहीर केले. लाडकी बहीण योजना, लाडकी मुलगी योजना, आनंदाचा शिधा, मुलींना मोफत शिक्षण, प्रवासात पन्नास टक्के सवलत, लखपती दीदी योजना अशा कितीतरी योजना महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी आणल्या आहेत. या योजनांमुळे महिलांच्या विकासाला हातभार लागणार आहे."
महिलांच्या योजना पोहचवल्या घरोघर :"महिलांसाठीच्या योजना शिवसेना महिला आघाडी राज्यातील ४० मतदारसंघात घरोघरी पोहोचवत आहे. घराघरांत त्यासाठी संपर्क साधला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० मतदारसंघात महिलांनी घरोघरी संपर्क केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा महिलांना किती फायदा झाला, त्या कशा उपयुक्त आहेत याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून या योजनांपासून कुणी वंचित राहिले आहे का, त्यांच्यासाठी नव्याने काय करता येईल, याचा आढावाही महिला आघाडी घेत आहे," असं त्या म्हणाल्या.