मुंबई Lok Sabha Election Results 2024: १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रामध्ये महायुतीला दारुण पराभव सहन करावा लागला. महायुतीमध्ये भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट हे तिघे जरी असले तरी निवडणुकीत संपूर्ण महायुतीचा रिमोट कंट्रोल हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हाती होता. भाजपातील केंद्रातील ज्येष्ठ नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संगनमतानं लोकसभा निवडणुकीची प्रत्येक गोष्ट ठरली होती. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या दारुण पराभवासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला जबाबदार ठरवत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकीमागे नेमकं कारण काय असू शकतं? याबाबत आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. नेमकं यामध्ये त्यांची काय भूमिका राहील याविषयी घेतलेला आढावा.
केंद्रीय मंत्री नेत्यांचा पराभव : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार झटका बसला आहे. अबकी बार ४५ पारच्या नादात ते २० चा आकडाही गाठू शकले नाहीत. मागच्या निवडणुकीत आपले २२ खासदार निवडून आणणाऱ्या भाजपाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नरेंद्र मोदी यांच्या सत्तेच्या अश्वमेधाला महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं रोखलं. हा महायुतीसाठी मोठा झटका असला तरी यामध्ये सर्वात मोठी हानी भाजपाची झालीय. भारती पवार, कपिल पाटील, रावसाहेब दानवे या केंद्रीय राज्य मंत्र्यांना पराभव सहन करावा लागला आहे. तर सुधीर मुनगंटीवार, हिना गावित, सुजय विखे पाटील, पंकजा मुंडे, नवनीत राणा या बड्या नेत्यांनाही हार पत्करावी लागली आहे. भाजपा नेत्यांचे चेहरे या पराभवानं पडले आहेत. पराभवासाठी काय कारणे असू शकतात याचं आत्मचिंतन करण्यासाठी भाजपा कोअर कमिटीची भाजपा प्रदेश कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अडीच तास चिंतन झालं. पण पराभवासाठी नक्की कारणे काय असू शकतात या निष्कर्षापर्यंत पोहचण्या अगोदरच पराभवाची सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देत असून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याचं सांगत सर्वांना धक्का दिलाय.
शिंदे-अजित पवार गटाचे मोठे नुकसान : देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करतेवेळी आपण सरकारमध्ये राहणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु पक्ष श्रेष्ठींनी त्यांना तसा आदेश दिल्यानंतर तो स्वीकारणं त्यांना बंधनकारक होतं. म्हणून ते उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ३५ ते ४० पर्यंत जागा येतील अशी अपेक्षा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला होती. ती अपेक्षा फोल ठरली आहे. भाजपाच्या तर फक्त ९ जागा निवडून आल्या. ४० जागा निवडून आणण्याच्या नादात केलेल्या जागावाटपाच्या हेराफेरीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे सुद्धा मोठे नुकसान झाले. म्हणूनच केंद्रीय नेतृत्व याबाबत कुठलीही कारवाई करण्यापूर्वी स्वतःहून देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या दृष्टीकोनातून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. उद्या राज्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष यांचीही उचलबांगडी होऊ शकते.