देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नागपूर DCM Devendra Fadnvis :लोकसभा निवडणुकीपूर्वी एक सर्व्हे पुढे आलाय. त्यात भारतीय जनता पार्टी प्रणित महायुतीला मोठी आघाडी मिळत असल्याचं दाखवण्यात आलंय, तर महाविकास आघाडीला नुकसान होणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, "सर्व्हे काहीही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या की वाईट येऊ द्या. लोकांची मानसिकता एकदम पक्की झालीय, नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा प्रधानमंत्री बनवायचंय. 2019 मध्ये जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाही, आल्या तर जास्त जागा निवडून येतील," असा दावाही त्यांनी केलाय.
मोदींबद्दल लोकांमध्ये आस्था :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या काटोल दौऱ्यावर होते. या दौऱ्याबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, "अतिशय छान अनुभव राहिलेला आहे. काल रात्री मुक्काम केला तेव्हा लोकांचं प्रेम अनुभवायला मिळालं. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करायला निवांत वेळ मिळाला. काटोल दौरा अतिशय चांगला झाल्याचं ते म्हणाले आहेत. पक्षाच्या संघटनेनं अतिशय उत्तम काम केलंय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. घरोघरी जात आहेत. निश्चित त्याचा परिणाम आहे. पण सर्वात मोठा परिणाम मोदींबद्दल असलेली आस्था आहे."
पंकजाताईंबद्दल चांगला निर्णय होईल :आगामी राज्यसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या मला भेटल्या यात काही नवीन नाही. राज्यसभेची चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा केली. कोण राज्यसभेत जाईल, कोण नाही याचा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड ठरवते. त्या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यांना कुठं पाठवायचं, त्यांना कुठलं पद द्यायचं याचा निर्णय केंद्रीय पार्टी करेल. मला विश्वास आहे, त्यांच्याबाबत चांगला निर्णय होईल."
चाय पे चर्चा :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाताला या गावात शेतकऱ्यांसोबत 'चाय पे चर्चा' केली. या वेळी शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. यानंतर फडणवीसांनी सांगितलं की, "शेतकऱ्यांना नेहमीच बारा तास वीज मिळाली पाहिजे हा मुद्दा आहे, सोलर फिडर योजना ही आणलेली आहे. 12 तास वीज देऊ शकतो अशी योजना आहे. घोषणे प्रमाणे काही लोकांना पन्नास हजार मिळालेले नाही. ती जर यादी मिळाली तर त्यांना ते देण्याची तरतूद आपण केलेली आहे. कापसाच्या संदर्भातला हमी भावापेक्षा कमी भावात कापूस खरेदी करत आहे. खरेदी केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली आहे. शेतकऱ्यांना विनंती हमीभाव पेक्षा कमी कापूस कोणी विकू नका. भाव अजून वाढले पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. छोट्या छोट्या समस्या आहेत त्यावर निश्चितपणे तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करु."
हेही वाचा :
- २०१९ मध्ये लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना जागा दाखवली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
- महाविकास आघाडीतील मतं फोडण्याचा भाजपाचा पुन्हा प्रयत्न, राज्यसभा निवडणुकीत भाजपा देणार चौथा उमेदवार?