मुंबई Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ त्यांची नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत आहेत. त्यातच सोमवारी भुजबळांनी समता परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा सूर 'भुजबळांनी किती दिवस हा अपमान सहन करायचा' असाच होता. मुंबईतील वांद्रे येथे सोमवारी समता परिषदेची बैठक झाली. या समता परिषदेच्या बैठकीत अँड. मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत चर्चा झाली. मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीदरम्यान या दोघांशीही फोनवरून संपर्क साधला आणि समता परिषद पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं. दोघांनीही तब्येतीची काळजी घ्यावी, अशी भुजबळांनी विनंती केली.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण नको : "ओबीसी प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नको, या आंदोलकांच्या भूमिकेशी आम्ही देखील ठाम आहोत," अशी भुजबळ आणि आंदोलक यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं. मागील 4 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचं पुण्यात तर लक्ष्मण हाके यांचं वाडीगोद्री गावात उपोषण सुरू आहे. त्यांना यावेळी पाठिंबा दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.